मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघड; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ‘दत्तधाम सरकार’ विरोधात तक्रार

SHARE:

संगमनेर – राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे. परंतू या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने राज्यात भोंदू बाबांच मोठ पीक आलं असून त्यांचं चांगलच फावत आहे. राज्यात आतापर्यंत तीन भोंदूबाबांना अटक करण्यात आली आहे. या दरम्यान संगमनेरमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. राजेंद्र गडगे असं या भोंदू बाबाचं नाव असून तो दुर्धर आजार मंत्रोच्चाराने बरे करण्याचा दावा करून लोकांकडून पैशे उकळत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी राजेंद्र गडगे या भोंदूला अटक केली आहे.

राज्यात अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली असताना आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून अशाच एका लुटारू भोंदू राजेंद्र गडगे मंत्रांच्या जोरावर दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत होता. हा भोंदू संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने दरबार भरवून लोकांची आर्थिक फसवणूक करत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर भोंदू राजेंद्र गडगेला अटक करण्यात आली.

भोंदू राजेंद्र गडगे याने ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले होते. या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे. यासाठी भोंदू गडगे भक्तांकडून ११ हजार, २१ हजार, ५१ हजार, अशा रकमा घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचं स्थानिक लोकांच म्हणणं आहे. या भोंदूवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या पाठपुरावा केला. अंनिसने या प्रकाराची दखल घेत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. बाबाकडून सुरू असलेला प्रकार म्हणजे चमत्कार नसून भक्तांचे आर्थिक आणि मानसिक शोषण आहे. कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करण्याची त्याच्याकडून दिशाभूल केली जात आहे. प्रशासनाने तातडीने फौजदारी गुन्हे नोंदवून आश्रमावर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या अनिता रंजना गवांदे यांनी केली आहे.

त्यांच्या मागणीवरून संगमनेर पोलिसांनी राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत मुख्य आरोपी राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा, आयटी ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट व्हिडिओ बनवून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात गेल्या १० वर्षांपासून भोंदू राजेंद्र गडगे याने शेकडो लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचे उघड झाले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा