मुंबई – महिला आरक्षणाच्या नावाखाली लोकसभेत आणलेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झालं. लोकसभेत झालेला हा पराभव राज्यातील भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यामुळे काल मुंबईतील वरळी डोम येथे भाजपच्यावतीने महिलाकडून आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली. यावरून वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली एक महिला चांगलीच संतप्त झाली. या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांनाच चांगलेच खडे बोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
काल मुंबईतील वरळी डोम येथे भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आलं, भाजपकडून महिलांकडून करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना जाण्या- येण्यासाठी वाट मिळत नव्हती. त्यामुळे त्यांना ताटकळत बसावे लागले. यामुळे एका महिलेनं थेट मोर्चास्थळी जाऊन चक्क मंत्री गिरीश महाजन यांनाच खडेबोल सुनावले. यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये देखील वाद झाल्याचं दिसून आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
महिलेनं मंत्री महाज यांच्यापुढे संताप व्यक्त करत, शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकल्याचं सांगितलं. विरोध करायचाच तर तो मैदानात करा. वाहतूक कोंडी का करत आहात? असा प्रश्न करत महिलेने महाजनांना सुनावले. महिला मंत्री गिरीश महाजनांवर संतापली. तिने रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे मंत्र्यांशी वाद घातला आणि त्यांना निघून जाण्यास सांगितले. महिलेचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून विरोधकांकडूनही शेअर केला जात आहे.
या घटनेवर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की या भगिनीने भाजपचा खरा चेहरा उघड केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले कि या भगिनीने भाजपचा खरा चेहरा उघड केला आहे, जो महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली राजकारण करतो, आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून महिलांची दिशाभूल करतो आणि त्यांना केवळ एक राजकीय साधन म्हणून वापरून खोटे दावे पसरवतो.
माहित असावे कि २०२३ मध्ये संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण पारित करण्यात आले होते. मात्र केंद्रातील भाजप सरकारने यांची अंमलबजावणी केली नाही. यानंतर नुकतंच केंद्र सरकारं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक घटना दुरूस्ती विधेयक आणलं. ज्यामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि इतर तरतुदी घुसडण्याचा प्रयत्न केला. या मात्र सरकारचा हा डाव विरोधी पक्षांनी हाणून पाडला. हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही. लोकसभेत झालेला हा पराभव भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागला असून आता भाजप नेते जे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही, त्याचे नाव न घेता महिला आरक्षणाचा गवगवा करून महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर लोकसभेत नामंजूर झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा महिला आरक्षणासी काडीमात्र संबंध नाही.




