नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी दोन दप्प्यात मतदान प्रक्रिया संपन्न झाली. आता ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र मजमोजणीपूर्वीच पश्चिम बंगालमधील राजकीय पारा तापला आहे. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोग आणि भाजपवर संगनमताचा आरोप करत सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. मतमोजणीपूर्वी मतपेट्यांमध्ये आणि ईव्हीएम मशीममध्ये छेडछाड केल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.
टीएमसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला. यात पक्षाच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत मतपेट्या उघडल्या जात असल्याचा आरोप केला आहे. पक्षाने याला दिवसा ढवळ्या लोकशाहीची हत्या असे संबोधत, निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली सुरू असलेला उघड निवडणूक घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. मतदार याद्यांमधून नावे वगळणे आणि मतदारांना धमकावण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता भाजप निराश होऊन ईव्हीएममध्ये छेडछाड करत असल्याचा दावा पक्षाने केला. या गंभीर आरोपांच्या निषेधार्थ शशी पांजा आणि कुणाल घोष यांनी इंडोर स्टेडियमसमोर तात्काळ आंदोलन सुरू केले. टीएमसीने इशारा दिला आहे की बंगालची जनता आपल्या जनादेशाची चोरी शांतपणे सहन करणार नाही. टीएमसीने याला एक हताश कृत्य म्हटले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रांवर चोवीस तास लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, मशीन्स बदलण्याचा कट रचला जात आहे, सतर्क राहा. टीएमसीने आरोप केला आहे कि स्ट्राँग रूम कधी उघडण्यात आली, याची आम्हाला माहिती देण्यात आली नाही. स्ट्राँग रूममध्ये कोण होते? ते काय करत होते?, ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला आहे, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात संगनमत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शुक्रवारी सखावत मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये पोहोचल्या आहेत, जिथे भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील ईव्हिएम आणि बैलेट बॉक्स ठेवण्यात आले आहेत. दक्षिण कोलकातामधील इतर अनेक मतदारसंघांतील बॅलेट बॉक्स देेखील तिथे ठेवण्यात आले आहेत. यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी ईव्हीएममधील कथित अनियमिततेबद्दल कडक इशारा दिला आहे. मतदान यंत्रांमध्ये किंवा मतमोजणी प्रक्रियेत कोणताही फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला मरेपर्यंत लढा दिला जाईल, असे त्या म्हणाल्या.
बॅनर्जी यांनी दक्षिण कोलकाता येथील सखावत मेमोरियल स्कूलमधील स्ट्रॉंगरूमला भेट दिली. हे स्ट्रॉंगरूम भवानीपूर विधानसभा मतदारसंघासाठी वितरण आणि स्वागत केंद्र असून, येथे ईव्हीएम आणि मतपत्रिका ठेवल्या जातात. त्यांनी इशारा दिला कि जर कोणी ईव्हीएम मशीन चोरण्याचा किंवा मतमोजणीत फेरफार करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आमरण लढू.
बॅनर्जी म्हणाल्या की इथे ईव्हीएमसाठी एक सुरक्षित खोली आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचे आमच्या लक्षात आले. जेव्हा मी ते टीव्हीवर पाहिले तेव्हा मला वाटले की मी इथे यायला हवे. त्या पुढे म्हणाल्या कि केंद्रीय दलांनी सुरुवातीला आमच्या प्रतिनिधींना आत जाण्यापासून रोखले, परंतु उमेदवार म्हणून आपले हक्क सांगितल्यावर त्याला जाऊ दिले. त्या म्हणाल्या कि निवडणूक नियमांनुसार, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सीलबंद खोलीत प्रवेश करण्याची परवानगी आहे.
बॅनर्जी यांनी भाजपची आघाडी दर्शवणारे एक्झिट पोलचे अंदाजही फेटाळून लावले आणि हा टीएमसी कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. मागील निवडणुकांचा दाखला देत त्या म्हणाल्या कि असे अंदाज यापूर्वीही चुकीचे ठरले आहेत. मतमोजणीपूर्वी प्रसारमाध्यमे एक विशिष्ट कथा तयार करत असल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या ते आम्हाला हरवू शकत नाहीत, म्हणून त्यांनी ही मोहीम सुरू केली आहे.






