पुणे – जनगणनेच्या कामासाठी जात असताना महिला शिक्षिकेचा अपघातात मृत्यू झाला आहे, तर शिक्षक संघटनांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. राज्यात आत्तापर्यंत जनगणना कामावर असलेल्या 4 शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील दीपाली तांबे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली आहे. राज्यात सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली असतानाही शिक्षकांची शाळा सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना जणगनणेचे काम कराव लागत आहे. भर उन्हात दारोदारी शिक्षक लोकांची जनगणनेसाठी भटंकती सुरू आहे. त्यातच, जनगणनेच्या कामाच्या तणावाने काही शिक्षकांमध्ये नाराजीचा सूरही पाहायला मिळत आहे. राज्यात जनगणनेचे काम करत असलेल्या आतापर्यत 3 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. आता, आणखी एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मावळ तालुक्यात जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना कान्हे फाटा येथे घडली आहे.
या घटनेनंतर शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा जनगणना कामी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने शिक्षिका दीपाली तांबे यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशीही जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना बोलावले जात असल्यावरुन शिक्षक संघटनांमधून संताप व्यक्त होत आहे. शिक्षकांना सुट्टीच्या दिवशीही जनगणना कामासाठी बोलवण्यावरुन प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तसेच, शिक्षिका दीपाली तांबे यांच्या अपघाती मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल शिक्षकांकडून केला जात आहे. तर, महामार्गावर भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीने कडक नियम आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. राज्यातील जनगणना करताना यापूर्वी राज्यातील 3 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातील भगवान पाटील आणि सांगोला येथील राजाराम ढोले, तर लातूर मधील सुंदरम वांगसकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुःखद घटनेनंतर त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे.
राज्यात जनगणना करणाऱ्या व कर्तव्य बजावताना शिक्षकांचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयाना 10 लाख रुपयांचे अनुदान द्यावे. तसेच कुटुंबीयांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने राज्यसरकारला केली आहे. या बाबतचे निवेदन खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघांचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






