मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालयात वऱ्हाड विकासचा ४० वा वर्धापनदिन थाटात संपन्न; कार्यक्रम प्रसंगी विशेष अंकाचे प्रकाशन…

SHARE:

अमरावती (प्रतिनिधी) : फुले-शाहू-आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील समर्थ साक्षीदार ‘वऱ्हाड विकास’ मासिकाचा ४० वा वर्धापनदिन कार्यक्रम मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चैतन्य कॉलनी, अमरावती येथे दि.२ जुलै २०२६ रोजी थाटात संपन्न झाला.

या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण श्री. मधुकरराव अभ्यंकर, संपादक सत्यशोधक समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक व अभंगकार शिक्षणभूषण प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले, नाट्यकर्मी प्रा. पुंडलिक भामोदे, लेखिका समाजभूषण डॉ. निर्मला भामोदे, प्राचार्य गजानन वानखडे, सुषमा राम शेकोकार, गोविंदराव फसाटे होते.

अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा सत्कार पुष्पगुच्छ, वृक्ष रोपटे व पुस्तके भेट देऊन वऱ्हाड विकास तर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांनी त्यांच्या ‘निखारा’ काव्यसंग्रहातील ‘क्रांतिज्योती’ या वंदन गीताने व ‘वऱ्हाड विकास’ या स्वरचित अभंग गायनाने करून सर्वांना मंत्र मुग्ध केले.

याप्रसंगी प्रा. श्रीकृष्ण बनसोड संपादित ‘वऱ्हाड विकास’ या मासिकाच्या वर्धापनदिन विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

“वाचनाने मास्तक घडते मग ते कुठेही नतमस्तक होत नाही.”
– प्रा. श्रीकृष्ण बनसोड
वऱ्हाड विकासाचे संस्थापक संपादक समाजभूषण – सत्यशोधक प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी प्रास्ताविक स्वागतपर भाषणातून “फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचन संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य वऱ्हाड विकास करीत आहे. भाकर ही माणसाला जगविते पण वाचनाने जीवन कसे जगावे हे समजते व मस्तक सुधारते मग ते कोणापुढे नतमस्तक होत नाही गुलाम होत नाही.” असे विचार व्यक्त केले.

“वऱ्हाड विकास हे बहुजनांना वैज्ञानिक व पुरोगामी विचारधारा देणारे विचारपत्र”
– मधुकरराव अभ्यंकर

अध्यक्षीय भाषणातून मा. मधुकर अभ्यंकर म्हणाले की,” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले,लोकशाही शासन प्रणाली दिली पण आज भारतात लोकशाही धोक्यात आलेली आहे सध्या लोकशाहीचे शासन प्रशासनाकडून वस्त्रहरण करणे सुरू आहे.वृत्तपत्र चालविणे हे सतीचे वान आहे.वऱ्हाड विकासच्या माध्यमातून हे सतीचे वान प्रा.बनसोड यांनी स्वीकारले आहे.” असे विचार व्यक्त केले.

“वंचितांच्या समस्यांना वाचा फोडणारे मासिक वऱ्हाड विकास”
– प्रा. अरुण बुंदेले
प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी, “वऱ्हाड विकास मासिक सामाजिक परिवर्तनाचा विचार समाजापर्यंत पोहोचविणारे विचारतंत्र असून वंचित समाजाच्या विविध समस्यांना वाचा फोडणारे मासिक म्हणजे प्रा. बनसोड यांचे वऱ्हाड विकास होय. या कार्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो ही मनस्वी सदिच्छा.” असे विचार व्यक्त केले.

“फुले शाहू आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचविणारे वऱ्हाड विकास”
डॉ. निर्मला भामोदे

प्रमुख अतिथी अकोला येथील समाजभूषण प्राचार्या डॉ. सौ. निर्मला पुंडलिकराव भामोदे यांनी “वऱ्हाड- विकास गेल्या ४० वर्षापासून कार्य करीत असून डोळस क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच इतर महामानवांचे विचार प्रा. बनसोड सर यांच्यामुळे घराघरात पोहोचत आहेत. तसेच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे ते प्रचारक आहेत. त्यांचे “वऱ्हाड-विकास” संपादनाचे कार्य पुढेही असेच जोमाने सुरू राहावे यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभावे, ही सदिच्छा.” असे विचार व्यक्त केले.

“नवोदित साहित्यिकांना घडविणारे मासिक वऱ्हाड विकास”
– प्रा. पुंडलिक भामोदे
याप्रसंगी प्रमुख अतिथी यांनी नाट्यकर्मी प्रा.पुंडलिक भामोदे यांनी, “वऱ्हाड विकास मासिकातून प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी अनेक नवोदित साहित्यिकांना घडविले. ४० वर्षापासून सरांचे वऱ्हाड विकास संपादनाचे कार्य सुरू आहे. वऱ्हाड विकास वाचन संस्कृती समृद्ध करणारे मासिक आहे.” असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी नाट्यकर्मी सुषमा राम शेकोकार यांनी “मी सावित्रीबाई फुले बोलते” हा नाट्यप्रयोग सादर केला.

याप्रसंगी मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन वानखडे यांनी आभार मानले तर संजय श्रीखंडे यांनी संचालन केले.
याप्रसंगी माजी मुख्याध्यापक सतीश फुंडकर, प्रा. सुधाकर गावंडे, राजू वाकोडे, कु. शीतल मानेकर, कु. कीरण गुर्जर, शिक्षकेतर कर्मचारी मनोज शिरभाते, बाबुराव चक्रे, विद्यार्थी वर्ग आणि वऱ्हाड विकास वर प्रेम करणारा वाचक वर्ग उपस्थित होता.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा