अमरावती : केंद्र शासनाच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलच्या 11व्या वर्धापनदिनानिमित्त रोजगार मेळावा पार पडला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्यात 68 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांच्या 6 उद्योजक प्रतिनिधींनी उपस्थित राहून नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यात 128 उमेदवार सहभागी झाले होते. मेळाव्यात क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड, प्रेसीजन मॅपिंग जीआयएस, क्वेस कॉर्पोरेशन, ईसीई एनर्जीज, स्वॅगी, आणि जाधव गिअर्स लिमिटेड या कंपन्यांनी सहभाग नोंदवून तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर यांनी करिअरविषयक मार्गदर्शन केले. तसेच कौशल्य विकास अधिकारी अभिषेक ठाकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शासकीय उपक्रमांतील उपलब्ध संधीचा लाभ घेऊन करिअर घडवण्याचे आवाहन केले.
वैभव तेटू यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यासाठी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी सुभाष गुल्हाने, संदीप यादव, यंग प्रोफेशनल क्रपा अरगुलेवार, दिलीप तांभारे, प्रथमेश सोहाळे आणि जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांनी पुढाकार घेतला.
रोजगार आणि कौशल्याशी संबंधित अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ncs.gov.in आणि mahaswayam.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.






