गडचिरोली : कोरची तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, कोटगुल येथे शिक्षण घेत असलेल्या संजना बिरसिंग जाळे (वय १५ वर्षे, रा. ग्यारापट्टी, ता. कोरची) हिच्या उपचारासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सविस्तर घटनाक्रम स्पष्ट केला असून, उपलब्ध माहितीनुसार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय मलेरिया उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेळेत उपचार, नियमित देखरेख आणि योग्य वेळी उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भन केल्याचे नमूद केले आहे.
डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी १७ जुलै २०२६ रोजी शासकीय आश्रम शाळा, कोटगुल येथे दाखल झाली. १८ जुलै रोजी तापाची तक्रार आढळल्यानंतर आश्रम शाळेतील एएनएम यांनी मलेरियाची RDK तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला. मात्र १९ जुलै रोजी ताप व डोकेदुखी कायम असल्याने पुन्हा तपासणी करण्यात आली असता P. vivax मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर एएनएम यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, कोटगुल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.
सदर दिवशी रविवार असूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता विद्यार्थिनीला प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून तिची तपासणी केली. त्यावेळी तिला १०२ अंश फॅरेनहाइट ताप असल्याचे निदर्शनास आले. तसेच हिमोग्लोबिन ७.५ ग्रॅम/डेसिलिटर आणि रक्तातील साखरेचे प्रमाण (RBS) १५१ मिग्रॅ./डेसिलिटर आढळले.
विद्यार्थिनी सिकल सेल AS Pattern असल्याची माहिती एएनएम यांनी दिली. तसेच घरी असताना ती नियमित फॉलिक ॲसिड गोळ्या घेत नसल्याचे, मात्र आश्रम शाळेत दाखल झाल्यानंतर तिला नियमित फॉलिक ॲसिड देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
राष्ट्रीय मलेरिया उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार P. vivax साठी आवश्यक ACT उपचाराचा पहिला डोस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली दिला. औषधानंतर सुमारे चार ते पाच तास विद्यार्थिनीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया आढळून न आल्याने आश्रम शाळेच्या एएनएम यांच्या विनंतीनुसार तिला शाळेत परत पाठविण्यात आले.
उपचारात खंड पडू नये म्हणून पुढील दुसरा, तिसरा आणि चौथा डोसही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली देण्यात आला. प्रत्येक भेटीदरम्यान विद्यार्थिनीची तपासणी करण्यात आली. त्या वेळी ताप उतरलेला होता आणि प्रकृती स्थिर असल्याचे आढळले.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली.)
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






