जिल्ह्यात ६८.८७ टक्के मतदारांचे गणना प्रपत्र जमा; प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार..

SHARE:

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एकूण ४६,३८,५८९ मतदारांपैकी ३१,९४,५७३ मतदारांचे (६८.८७ टक्के) गणना प्रपत्र स्वाक्षरी करून प्राप्त झाले आहेत. याची डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून सुमारे १४ लाख ४४ हजार १५ मतदारांचे (३१.१३ टक्के) गणना प्रपत्र जमा झाले नाहीत.

गणना प्रपत्र जमा न झालेल्या १४ लाख ४४ हजार १५ मतदारांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) प्रत्यक्ष गृहभेट दिल्यानंतर सापडू न शकलेले किंवा गैरहजर असे ५ लाख ४६ हजार १४९ (११.७७ टक्के), कायमस्वरूपी स्थलांतरित ५ लाख ३० हजार(११.४३ टक्के), मृत २ लाख ४० हजार ३०५ (५.१८ टक्के), दुबार नोंदणी झालेले १ लाख १८ हजार १२ (२.५४ टक्के) आणि इतर ९ हजार ४९१ (०.२० टक्के) मतदारांचा समावेश आहे. यातील मृत व दुबार वगळता इतर मतदारांना दिनांक २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत आपली बाजू संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे मांडता येईल.

प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव त्या यादीत तपासून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ज्या मतदारांचे नाव या यादीत समाविष्ट नसेल त्यांना नवीन मतदार नोंदणी करिता फॉर्म 6 व आवश्यक कागदपत्रे पुराव्यासह 24 ऑगस्ट 2026 पासून जमा करता येतील. कोणताही पात्र मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाही असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) भरून घेण्याची मुदत १७ ऑगस्ट, २०२६ पर्यंत होती. सदर काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४६,३८,५८९ (१०० टक्के) मतदारांबाबत पडताळणी (Verification) पूर्ण करून नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.

गणना प्रपत्र जमा न झालेल्या मतदारांच्या नावांच्या याद्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO) मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (BLA) उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी नागपूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर या मतदारांची विधानसभा मतदारसंघनिहाय एकत्रित यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर.)

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment