ऋषिपंचमी मंगलदिनी, समाधीस्थ झाले, श्री. गजानन योगी…………

भाद्रपद शुद्ध पंचमी, ऋषिपंचमीचा पावन दिन ऋषिमुनींनी मानवाला संस्कार विचाराने मानव बनवले, त्यांच्यात देवत्वही प्रगटवले. मनोभावे त्यांचे भावपूर्वक स्मरण करण्याचा संकेत भारतीय संस्कृतीने आम्हाला दिला आहे.
कश्यपो… त्रि भरद्वाजो विश्वामित्रस्तु गौतमा.., जमदग्नी वशिष्ठश्च सप्तैते रुशया.. स्मृत.. कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ हे ऋषी समुदायातील देवर्षी आहेत. सर्व पापांचे क्षालन करणारे आहेत. ऋषीमुनींचे जीवन हे ईश्वराला समर्पित असते, ते मंत्र दृष्टेच आहेत. गण गण गणात बोते, सर्व गणात आत्मा एकच आहे, मानवता वादाचा, समताचित विचारांचा हा भावमंत्र प्रबोधित करणारे, योगी गजानन महाराज याच अध्यात्म संस्कार वर्तुळातील आहे.
शिव भावे जीव सेवा करणाऱ्या अलौकिक संतांच्या मांदियाळीत शेगावीचे योगी योगेश्वरांचे स्थान अद्वितीय आहे. साधू देविदास पातुरकरांच्या घराबाहेर पडलेल्या, उष्ट्या पत्रावळीवरील भाताचे कण वेचून खाणाऱ्या युवा अवस्थेतील गजाननाचे प्रथम दर्शन शेगावकरांना झाले. तो सुदिन होता दि. २३ फेब्रुवारी १८७८ दिगंबर वृत्तीतील ह्या संताच्या जीवनशैलीतून, जनसमुहाला विविध प्रसंगी निर्माण झालेल्या चमत्कारातून, अनुभूती मिळाली. जानराव देशमुख मरणोन्मू स्थितीतून बाहेर पडले. कोरड्या विहिरीला पाणी लागले. द्वाड घोडा आणि गाईचा स्वभाव बदलविला. पितांबराचा धावा ऐकून, श्रींनी कोरड्या वृक्षाला पालवी आणली. आणि मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेला, गीता रहस्य हा ग्रंथ ही श्री गजाननाचा कृपाप्रसादाच असे संतकवी दास गणु महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात नोंदविलेले आहे.
अलौकिक मानवतावादी भगवद् कार्य चालू असतांनाच, श्री गजानन रुपी ज्ञानगभस्तीने, अस्तास जाण्याचा संकेत भक्तगणांना दिला. आषाढी कार्तिकीच्या पावन पर्वात, निष्ठावंत भक्त श्रीहरी पाटलांना घेऊन पंढरपूरला पंढरीनाथाच्या दर्शनास आले. चंद्रभागेत स्नान करून दर्शनाला राऊळात गेले. आणि पंढरीनाथाला म्हणाले, ..तुझ्या कृपेने आजवर, भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर, त्यांचे मनोरथ पूर्ण केले.. आता मला आज्ञा द्या. भाद्रपद महिन्यात तुमच्या चरणकमला जवळ येण्याची माझी इच्छा आहे, असे म्हणतांना त्यांच्या नेत्रात अश्रू आले. श्रीहरी पाटील म्हणाले, समर्था, माझे काही चुकले असेल तर, मला क्षमा करा. समर्थ म्हणाले, श्रीहरी हा विषय खोल आहे, इकडे लक्ष देऊ नको, मला घेऊन शेगावी चाल. समर्थ शेगावी आले. श्रीहरी पाटलांनी पंढरी वारीचे मावंदे केले याप्रसंगी आलेल्या मंडळीला, श्री. हरी पाटील सांगू लागले की, समर्थांनी पंढरीनाथाजवळ मागणे मागितले, मला आज्ञा द्या. श्रींची आणि आपली संगत फार थोडी आहे.
पुढे भाद्रपद मास आलाश्री. गणेश चतुर्थीच्या दिवशी, गजानन म्हणाले, पंढरीनाथा, या पार्थिव देहाला तुम्ही आनंदाने बोलावा. उपस्थित असलेल्या भक्तांना, वैकुंठी जाण्यापूर्वी श्री. गजानन महाराजांनी उदास झालेल्यांना संजीवन विचार दिले… मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कथा मजलागी विसरू नका मी आहे येथेच.. श्री गजानन विजय ग्रंथ अ.१९.११ ऐसे भाषण करून, योगे रोधिला असे प्राण, दिला मस्तकी ठेवून, त्या महात्म्या पुरुषाने २०.१२ शके १८३२, साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस, गुरुवार प्रहर दिवसाला २०.१३ प्राणरोधता शब्द केला, जय गजानन ऐसा भला सचिदानंदी लिन झाला, शेगावा माझारी २०.१४ माघ शुद्ध पंचमी शके १८३२ दि. o८ सप्टेंबर १९१० रोजी सकाळी o८ वाजता, ईश्वराच्या जयजयकारात, मंगल घोषात, योगी योगेश्वर श्री. गजानन महाराज संत नगरी शेगावला समाधीस्थ झाले. श्री गजाननाच्या वास्तव्याने पूनित शेगाव नगरी, आज अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले आहे.
जय जय सत् चित स्वरूपा, स्वामी गणराया..
अवतरलाशी भूवर जढ्मूढ ताराया, जय देव जय देव…
संत चरणरज –
डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,
संत साहित्य अभ्यासक, शेगाव.
संपर्क – ९४०४५५३५०५
Author: डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
लेखक डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील, से. नि. शिक्षण केंद्रप्रमुख असून, संत साहित्याचे व्यासंगी उपासक आहेत. महाराष्ट्रातील विविध दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रे, मासिके आणि वार्षिक अंकात त्यांचे ४५० लेख प्रकाशित झाले आहेत. संत साहित्याचे मंथन करून, शब्दांकित केलेला चिंतन ग्रंथ ही प्रकाशित झालेला आहे. सखाश्री आध्यात्मिक साहित्य मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा प्रदान केलेली आहे. त्यांचे साहित्य लेखन सेवा कार्यआजही सातत्याने सुरूच आहे. एम. ए. एम. एड् साहित्य विशारद, पीएच.डी. उच्च पदवी प्राप्त मिरगे सर, उत्कृष्ट किर्तन प्रवचन कार असून, त्यांनी विदर्भ क्षेत्रात गेल्या ४० वर्षात, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, ५०० च्या वर कीर्तन, प्रवचन सेवेचे कार्यक्रम सादर केले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार २००१, महामहिम राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते, त्यांना प्राप्त झाला असून, भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. शिक्षण, साहित्य, सामाजिक सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल, महाराष्ट्र शासन, विविध सेवाभावी संस्था, समाज मंडळांच्या वतीने, एकूण १८ दर्जेदार पुरस्कारांनी ते गौरवान्वित आहेत.. महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा, उत्कृष्ट लेखन कार्याचा दर्जेदार, अध्यात्मिक वांग्मय पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. विनम्र, सेवाभावी, गुणवंत, प्रज्ञावंत, उत्कृष्ट अध्यापक म्हणून ते आजही समाजप्रिय आहेत.





