संवाद….
१.
संवादाविना मन, होते पाषाण |
तुटे जन नाते, अंधार दाटे ||१||
बोला मुखाने दोन, गोड शब्द प्रेमाचे |
जोडा हृदयाला हृदय, हेच सुख जीवाचे ||१ ll
२.
ऐका एकमेकांचे, दुःख अंतरीचे |
हसू वाटूनी घ्यावे, सुख जीवनाचे ||१||
मोठा छोटा न मानी, समता ठेवा मनी |
संवाद हा सेतू, जोडतो धरणी ||२ll
३.
मोबाईल हाती आला, संवाद हरपला |
शेजारी असूनिया, माणूस दुरावला ||१||
डोळ्यात पाहुनी बोला, हात हाती घ्या |
माणसात माणूसकी, पुन्हा जागवूया ||२ll
४.
गावगाडा चालतो, संवादाच्या बळे |
वादातून संवाद, प्रगतीचे पाऊल ||१||
भांडण नको वादाचे, चर्चा हवी ज्ञानाची |
गाव माझा सुखी होई, हीच रीत माणसाची ||२ll
५.
जात पात विसरा, माणूस एक माना |
संवादातून कळे, एकची आत्मा जाणा ||१||
भिंती पाडा मनाच्या, द्वेष जाळा सारा |
प्रेमाचा संवाद हाच, धर्म खरा न्यारा ||२ll
६.
स्त्रीचे मत ऐका हो, तिचा मान राखा |
लेकीच्या बोलामध्ये, उद्याचा वेध पाहा ||१||
अर्धे आकाश तिचे, अर्धे भूमंडळ सारे |
संवादातून द्यावे, तिला हक्क सारे ||२ll
७.
तरुणाईला बोला, ऐका त्यांचे स्वप्न |
रागाने नको, जप त्यांचे मन ||१||
जुन्या नव्याचा मेळ, घाला संवादाने |
भविष्य घडेल सुंदर, एकतेच्या नादाने ||२ll
८.
शाळा शिकवते अक्षर, घर शिकवे संस्कार |
संवादातून घडतो, पिढीचा आकार ||१||
आई बापाने मुलांशी, रोज बोलावे काही |
त्यांच्या मनातले जाणा, दुसरे कोणी नाही ||२ll
९.
सत्य बोला निर्भय, पण बोला गोड |
संवादाचे शस्त्र हे, तोडी क्रोधाची जोड ||१||
कटू बोलाने तुटे, नाते जन्माचे |
गोड बोलाने जुळे, सुख माणसाचे |l२ll
१०.
समाज म्हणजे आरसा, आपणच त्यात दिसू |
जसा संवाद करू, तसाच प्रतिध्वनी ऐकू ||१||
चांगले पेरा मुखाने, चांगलेच उगवेल |
संवादाने हे जग, स्वर्ग बनून जाईल ||२ll
११.
शोभा म्हणे जना हो, करा संवाद रोज |
मनातील कचरा जाईल, येईल प्रेमाची मौज ||१||
संवाद हाच देव, संवाद हाच धर्म |
त्याविन माणसाचे, व्यर्थ सारे कर्म ||२ll
ग्रामगीताचार्य –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






