तुका म्हणे, शोभा सांगे…
संत तुकाराम महाराजांचे आवडते उपास्य दैवत विठ्ठल होते. आणि त्याच्या भक्तीसाठी नामस्मरण हे सुलभ, सोपे, आणि साधे असे साधन त्यांनी निवडले.
“नामसंकीर्तन साधन पै सोपे l
जळतील पापे जन्मानंतरीची ll”
विठोबाचे नामचिंतन हे तुकोबाच्या भक्तीचे अंतरंग आहे. नाम चिंतनानेच त्यांचे चित्त चैतन्यमय झाले. अखंड नामस्मरणाचा आनंद सर्वकाळ भोगल्याशिवाय चित्तशुद्धी आणि साक्षात्कार होत नाही. नाम संकीर्तन हे सोपे साधन असल्याने जन्मांतरीची पापे जळून जातात. वनांतरी जाण्याचे सायास करावे लागत नाहीत. नारायण हा सुखाने घरी येतो. म्हणून आपल्या ठिकाणीच बसून “स्थायीच बसून करा एक चित्त” तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे एकचित्ताने नारायणाला आवडीने आठवावे.
रामकृष्ण हरि, विठ्ठल, केशवा, पांडुरंगा हा मंत्र सर्वकाळ जपावा. संत तुकाराम सांगतात की याशिवाय कोणी काही साधन आहे असे सांगत असेल तर ते काही खरे नाही. नामसंकीर्तन हे सर्वाहून सोपे साधन आहे. शहाणा माणूस हे साधन करून तृप्त होईल.
तुकारामांनी नामस्मरणाचा अखंड छंद लावून घेतला.स्वतः धन्य झाले.आणि आपला स्वानुभव लोकांना सांगितला.
गोविंद, गोविंद l
मना लागलीय छंद ll
मग गोविंद ते काया l
भेद नाही देव तया ll
नामामृताची गोडी चाखल्यावरच नाम चिंतनाची किमया तुकाराम सांगतात. मनाला गोविंद नामाचा छंद लागला तर हे शरीर देखील वेगळे उरत नाही. देव आणि भक्त एकरूप होतात..
भिंगूरटीच्या ध्यानाने अळी जशी स्वरूपाने वेगळी उरत नाही. त्याप्रमाणे गोविंदाच्या नाम चिंतनाने भक्त गोविंदमय होतो. तुकारामांनी भक्तिमार्ग बहुसोपा सांगितले. त्या आधी ज्ञानेश्वरांनी देखील सांगितले आहे की
“अथवा हे चित्त l
मन बुद्धी सहित l
माझ्या हाती अचूंबिता, न शकसी देवो ll”
इतकी सवलत दिलेली आहे. त्याही पुढे ज्ञानेश्वर असे म्हणतात
“तरी गा ऐसे करी l
या आठा पहरी माझारी l
मोटके निमिशु भरी l देतजाईं ll
म्हणजे आठ प्रहारा तून केवळ काही क्षण देवाला अर्पण करावे.. हा अती सुलभ उपाय करावा असे कोणाला वाटणार नाही.
“भक्ती पंथ बहु सोपा ” असे म्हणणारे संत तुकारामच
१) “भक्ती ही कठीण शुळावरील पोळी l
निवडितो बळी विरळा शूर ll”
२) “जेथे पाही तेथे देखील पर्वत l
पायावीण भिंत तातडीची ll
३) तुका म्हणे मना पाहिजे अंकूश l
नित्य नवा दिस जागृतीचा ll
तुकारामांनी असे का म्हटले असावे ? वरवर भक्ती करणाऱ्याला ती पुरण पोळी खाण्यासारखी गोड लागत असेल. परंतु प्रत्यक्षात ती सुळावरील पोळी खाण्यासारखी आहे. तसे करणारा एखादाच शूर बलवान तावून सुलाखून निघतो. बाकी जिकडे पहावे तिकडे शोभेचे पर्वतच दिसतात. पाया नसताना भिंत असावी तसा भक्तीचा देखावाच दिसतो. मेहनत घेऊन स्वयंपाक केला तर त्याला ओज आणि रुची प्राप्त होते. आणि त्याची स्तुती ही होते. तुकाराम महाराज सांगतात की मनाला अंकुश लावला पाहिजे. रोज नवीन जागृती आली पाहिजे. मन सदैव जागृत व सावध असले पाहिजे. मनाला श्रद्धायुक्त विवेकाच्या अंकुशाची नित्य टोचणी पाहिजे. तेव्हाच भक्तीला गोडी आणि तेज येईल. मनाला अंकुश लावणे वाटते तितके सोपे नाही. मन शुद्ध पवित्र असणे अतिशय कठीण आहे. म्हणूनच त्यांनी भक्तीला “सुळावरील पोळी” म्हटले आहे.
लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड.
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्य अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






