राष्ट्रसंत वं. तुकडोजी महाराज – जीवन शिक्षणाची बोधशाळा (भाग २)

SHARE:

राष्ट्रसंतांची ग्रामगीता – अक्षर साहित्य संपदा

“ग्रामगीता नव्हे पारायणासी l 
     वाचता वाट दावी जनसी ll
समूळ बदलवी जीवनासी l
     मनी घेता अर्थ तिचा ll”
वं. राष्ट्रसंतांची आजमितीला खुपसारी लेखन संपदा उपलब्ध आहे. हे लेखन गद्य पद्य स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचं सर्वच वांड:मय सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक अशा साऱ्याच दृष्टीने महत्वाचे आहे. या साहित्यातून वाचकांना आणि भक्तांना रोज नित्यनूतन अशी दृष्टी प्राप्त होते.

  राष्ट्रसंतांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी ग्रामगीता ग्रंथाबद्दल बोलायचे झाल्यास ग्रामगीता अत्यंत प्रासादिक असा ग्रंथ आहे. ही वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अक्षर साहित्य संपदा आहे. १९५३ साली पंढरपूर येथे आषाढी एकादशीचे दिवशी वं. राष्ट्रसंतांना हृदयातून ग्रामगीता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. या ग्रंथाचे आणखी एक विशेष म्हणजे १९५४ च्या  मे अखेर पर्यंत धावत्या प्रवासात वेळ मिळेल तसतसा त्यांनी हा ग्रंथ लिहून काढला. तो ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर चोरीला गेला. पण योगायोगाने तो मिळाला आणि प्रकाशित ही झाला. या ग्रंथास “माणिक स्मृती” असेही म्हणतात.

     गीताजयंतीच्या शुभमुहूर्तावर एकाच दिवशी भारताच्या अनेक भागत सुमारे१००० स्थळी ग्रामगितेचे प्रकाशन झाले. त्याच दिवसापासून ग्रामगीता जीवन संजीवनी म्हणून ग्रामगीता ग्रंथ सर्वांना सुपरिचित झाला. या ग्रंथाच्या प्रथामावृत्तीसाठी कलकत्ता निवासी दानशूर शेठ यांनी रू ७०००/- ची देणगी दिली. तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य केले.

     भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. शंकरदयाल शर्मा यांनी १९९६ साली क्रांतिभुमी चिमूर येथे १६ भारतीय भाषेत ग्रामगितेचा अनुवाद व्हावा असा आपला मनोदय व्यक्त केला. प्रकाशनाच्या वेळीच या ग्रंथाला मान्यता मिळाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तुकडोजी महाराज यांचे साहित्यविचारधारा हा M.A. साठी स्वतंत्र विषय आहे. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठात M.A च्या वर्गाला  ग्रामगितेचे काही अध्याय अभ्यासाला आहेत.

   लोक घरोघरी या ग्रंथाचे वाचन करतात. काही मंदिरांमधून नित्य पठण व पारायणे चालू असतात. काही विशिष्ट वारी वं. राष्ट्रसंत विचारांचे समर्थक एकत्र येऊन ध्यान, सामुदायिक प्रार्थना सोबतच महाराजांचे विचार सांगतात. तसेच सार्वजनिक संस्था, वाचनालये, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, प्राथमिक, माध्यमिक शाळा, काही सहकारी संस्था, आकाशवाणी इ. ठिकाणाहून ग्रामगितेतील विचारांचे प्रसारण होत असते. प्रवचनकार, कीर्तनकार, महाराजांच्या विचारांचा प्रसार, प्रचार करण्यात अग्रेसर आहेत.

   ग्रामगीता हा आजचा एक थोर ग्रंथराज आहे. अतिशय सुगम सर्वांना समजेल अशा आणि आपली वाटेल अशा भाषेत तो लिहिला आहे. या ग्रंथात महाराजांनी आपला प्राण ओतला आहे. प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या उद्धाराची तळमळ यात दिसून येते. वं. राष्ट्रसंताच्या हृदयात लोकांच्या उद्धाराचा विचार आल्यापासून म्हणजे १९३० सालापासूनचा विचार असून महाराजांच्या कार्यप्रणालीचे स्वरूप यात ठायी ठायी दिसून येते.

    ग्रामगितेत एकूण ४१ अध्याय आहेत. यात ८ पंचके असून ४१ वा अध्याय ग्रंथ महिमा साठी आहे. पंचकांची नुसती नावेही या ग्राम गीतेचे क्षेत्र किती व्यापक हे समजण्यासाठी पुरेसे आहे.

१. सद्धर्म मंथन पंचक. 

२. लोकवशिकरण पंचक.

३. ग्रामनिर्माण पंचक.

४. दृष्टीपरीवर्तन पंचक.

५. संस्कर्शोधन पंचक.

६. प्रेमधर्म स्थापन पंचक.

७. देवत्वसाधन पंचक.

८. आदर्श जीवन पंचक..

    यात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक मानवी आयुष्यातील समस्यांवर आणि उपाय योजनांवर महाराजांनी भाष्य केलेले आहे. मार्मिक निरीक्षण, लोकसमाजाचे दोष दिग्दर्शन व निवारण यातून ग्राम सुखी व्हावा पर्यायाने देश सुखी होण्यासाठी पसायदानच मागितले आहे. सर्व रचना ओवी बद्ध्द आहे. ओम किंवा ईश्वर या मंगल नामाने या ग्रंथातील पंच्काची सुरुवात झाली आहे. व्यक्तिगत उद्धारा सोबतच भारताच्या नवनिर्मितीचा विचार हे या ग्रंथाचे वेगळेपण आहे.

आचार्य विनोबा भावे म्हणतात, “त्यांची ग्रामगीता त्यांनीच म्हटल्याप्रमाणे “स्वानुभव संमत” आहे. त्यामुळे आपोआपच ती शास्त्र समतही झाली आहे.”
विवेकाच्या बैठकीवर जुन्या व नव्या श्रद्धांचा वं.महाराजांनी समन्वय केलेला आहे. सर्वसामान्यपणे आपण पाहतो की अध्यात्मिक वृत्तीने जगणारे शेवट पर्यंत अध्यात्मिक राहतात. त्यांचे अनुयायी आपल्या गुरूनी सांगितलेल्या कर्मकांडा नुसार आपले जीवन जगतात. पण राष्ट्र संतांच्या बाबतीत वेगळी गोष्ट अनुभवास येते. महाराजांचे व्यक्तिमत्व अध्यात्मिक अनुभूती प्रमाणेच सामाजिक अनुभूतीने समृद्ध, संपन्न व परिपूर्ण आहे. म्हणूनच त्यांचे समाज सुधारकात सहज परिवर्तन झाल्याचे आपणास दिसून येते. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही उमटविलेला आहे.

    वं. महाराजांची रचनाशैली अत्यंत प्रसन्नतेने नटलेली आहे. त्यात विचारांची सुस्पष्टता आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामगीता सर्वच स्तरावरील वाचकांसाठी अत्यंत सुबोध आहे. म्हणूनच ती प्रासादिक वाटते. आज असे चित्र दिसते की खेड्यापाड्यातून पसरलेल्या लोकांपर्यंत या ग्रामगितेची हाक पोचत आहे. या लोकांमधे गरीब श्रीमंत, श्रेष्ठ कनिष्ठ असा कोणताही भेद नाही. “सबके लिये खुला है मंदिर ये हमारा” असे महाराज म्हणतात. ग्रामगीता सर्वांसाठी आहे. यात ग्रामसुधारणेची दिशा आहे. आळस, व्यसने यांना इथे स्थान नाही. प्रत्येकाने सत्कर्म करावे. माणसासारखे जगावे. झोपलेल्या ना जागे करण्याचे काम ग्रामगिता करते.

  शैलीच्यादृष्टिने हा ग्रंथ संतग्रंथांच्या परम्परेतीलच आहे.. यावरही पुढे शेकडो भाष्य होतील. ग्रामगीता हा लोकोत्तर ग्रंथ आहे. लोकशाही व लोकजिवनाचा समन्वय कसा करावा याचे उत्तम मार्गदर्शन ग्रामगीता करते. मागासलेले आणि झाकोळलेले मराठी माणसाचे जीवन ग्रामगितेचे अनुसरण केल्याने समाजाला नवे वळण लावण्याचे काम हा ग्रंथ करेल.
“ईश्वरे व्यापिले हे विश्व l म्हणोनी जगची आम्हा देव ll
विश्वाचा मूळ घटक गाव l ग्रामगीता त्यासाठी ll
ग्रामगितेद्वारे ग्रामसुधारणेचा कामी फार मोठी मदत झाली आहे.

    ग्रामगीता हा वं. गुरूदेवांचा संकल्प आहे. नवीन युगास नव्युग्धर्म, प्रेमधर्म, माणूस धर्म, शिकवावा. त्यायोगे समस्त मानव जातीत प्रेम निर्माण होऊन परस्परांच्या सहयोगाने माणसाचा उद्धार होउन राष्ट्राची उन्नती व्हावी.
“खेडूतांच्या तात्विक जीवनापासून तो धार्मिक जीवना पर्यंत सर्वांगीण जीवनाच्या पूनरघटनेचा एका परीने सूत्र ग्रंथचं आहे.” असे या ग्रांथाबद्दल ग. त्र्य. माडखोलकर म्हणतात.

“ही नव्हे फुले टाकण्यासाठी l 
      ही ग्रामाची उध्दार दृष्टी ll
आजच्या युगाची संजीवन ब्युटी l
    मानतो आम्ही ग्रामगीता ll” (४१/६७)

        

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा