बंद मुठींनी जन्मा येणे, येथून जाणे रित्याच हाती…

SHARE:

विचार संपदा….

जगात येतांना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने येतो. व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो .जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध सर्व येथेच सोडून द्यावे लागते, हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे. एक दिवस जगातील सगळ्यांना, तुम्हाला राम राम करायचा आहे. अगदी तुमच्या शरीराचा सुद्धा तुम्हाला निरोप घ्यायचा आहे. प्रत्येक जण कधी ना कधी जाणारच, फरक एवढाच की, काही लोक लवकर जातील, तर काही उशिरा जातील. मृत्यू कधी येणार हे ईश्वराशिवाय कोणीही सांगू शकत नाही. अनामिक कवी म्हणतात, कोठे व्हावा जन्म आपुला, मरणही कोठे कसे यावे, स्वाधीन नाही यातील काही, पदरी पडले गोड मानावे…

जगाचे नियंत्रण करणाऱ्या विश्वचालकाने साऱ्यांचे पासपोर्ट्स तयार करून ठेवले आहेत. त्यावर शिक्केही मारले आहेत. तारीख ही निश्चित केलेली आहे. तो दिवस आला की, तुम्हा आम्हा सर्वांनाच मुकट्याने या जगातून प्रस्थान करावे लागणार आहे हे वास्तव आहे. काळाची ही उडी पडेल बा जेंव्हा, सोडविना तेव्हा राव रंक.. जगात जगत असतांना, दोन गोष्टींचा कधीही विसर पडू देऊ नका. “पहिले म्हणजे ईश्वर आणि दुसरे म्हणजे आपला मृत्यू.” ‘कोण दिवस येईल कैसा, याचा न कळेची भरवसा,’ उद्या जायचे आहे त्याचाच विसर माणसाला पडला आहे. सारखी धावा धाव सुरू आहे. एक धावतो म्हणून दुसरा धावतो. धावणाऱ्याला कोठे थांबावे, हेच कळेनासे झाले आहे. या व्यापक ब्रम्हांडाच्या पसाऱ्यात आपले अस्तित्व नगण्य आहे. संत म्हणतात, संकटाच्या क्षणी फक्त परमेश्वराचा आधार असतो. संत तुकोबाराय म्हणतात,
“मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया,
अजून तरी होई जागा, तुका म्हणे पुढे दगा..”

मृत्यूचा प्रवास खूप लांबचा आहे. या लांबच्या प्रवासात निघतांना, घरात धान्याची भांडारे असली तरी, चिमूटभर पिठही सोबत नेऊ शकत नाही. धन मिळवुनी कोटी सवे न येरे लंगोटी.. कवी म्हणतात, उंच उंच माडी, लाल हवेली, हे घर म्हणशील माझे रे.. अखेर शेवटी तुझ्या नशिबी, स्मशानी काया उघडी रे.‌.

०१. सोन्या चांदीचे तांबे पितळचे, हे भांडे म्हणशील माझे रे, अखेर शेवटी तुझ्या नशिबी, मातीचे एक मडकेरे..

०२. पैसा खूप काही होऊ शकतो, पण सर्व काही कधीही होऊ शकत नाही.

जीवनामध्ये ज्यांनी पैशालाच महत्त्व दिले, त्यांच्यावर जीवनाच्या शेवटी, पश्चाताप करण्याची वेळ येते. सम्राट सिकंदर बादशहाने मरणापूर्वी आपल्याजवळ असलेली प्रचंड संपत्ती पाहिली. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. कारण त्याला समजले की, मिळविलेली ही संपत्ती आपल्या सोबत नेता येणार नाही…
लाया तू क्या सिकंदर और साथ क्या ले जा रहा..
दोनो हाथ खाली थे, कफनसे बाहर निकले..
सिकंदर जब दुनियासे गये तो दोनो हाथ खाली थे..

देश घडविणारी युगंधर व्यक्तिमत्वे याच पद्धतीने मृत्यूच्या दारापर्यंत पोचली आहेत. निसर्गाचा हा नियमच आहे. प्रत्येक माणसाने वास्तवतेची ही जाणीव ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीनेचआपला आचार, विचार निर्मळ ठेवला पाहिजे आणि जीवनाचे कल्याण केले पाहिजे. जीवनात केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व गोष्टी होतीलच असे नाही, परंतु जीवन प्रवासाचा शेवट निश्चित चांगला होईल. संत जनांनी आम्हाला सांगितले आहे की, एखाद्याची प्रेत यात्रा रस्त्यावरून जातांना, अरेरे, बिचारा गेला, असे कधीही म्हणू नका. कारण याच रस्त्याने आपल्याला जायचे आहे. अर्थी निघण्यापूर्वी आपण जीवनाचा अर्थ समजून घ्यायला हवा.
‘नको म्हणू माझे माझे, तुझे नसे काही, हाक येता यमराजाची, सर्व येथे राही..’

जन्मभर धावपळ कष्ट करून, मिळवलेल्या संपत्तीचा एक पैसाही सोबत नेऊ शकत नाही. मृत्यूनंतर आपले काही उरत असेल तर, आपण केलेली सत्कर्मै. निस्वार्थपणे केलेले कार्य, दुसऱ्यासाठी जगलो होतो ते क्षण, केलेल्या प्रत्येक कामाचा हिशोब आपल्याला द्यावे लागेल. जगताच्या चालकाला फसवण्याची शक्ती तुमच्यात नाही. म्हणूनच संत कबीरजी म्हणतात, ‘चिटीके पाव मे, घुंगरू बजता है, ..वो भी अल्ला सुनता है.’ म्हणून लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी, याचा विचार करा. सत्कृत्याच्या पुण्याईची शिदोरी सोबत घ्यायची आहे. त्याकरता जीवनाला सुसंस्काराचा स्पर्श होऊ द्या. इतरांच्या चुका काढण्यापेक्षा, स्वतः विधायक कामाला लागा. अपशब्द बोलू नका आणि प्रभू कडे एकच मागणी असु….
“संत पदाची जोड, देरे हरि संत पदाची जोड, संत समागममे आत्म सुखाचा, सुंदर उगवे मोड, तेरे हरी संत पदाची जोड..”

प्रत्येक माणसाला प्राप्त झालेले जीवन अतिशय कमी आहे. कोणत्या वेळी काय होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून प्राप्त झालेल्या मर्यादित वेळेचा उपयोग, विधायक पद्धतीने होणे आवश्यक आहे, हाच जीवनामध्ये दृष्टिकोन ठेवा. मानवी प्रबोधन करताना संत मांदियाळीतील सर्व संत जनांनी दिलेला संदेश स्मरणात असू द्या… घटका गेली पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो, राम कारे म्हणाना.. जीवनाच्या सार्थकतेसाठी उत्साहाने चांगली कर्तव्य करा. जीवन गुणात्मक दृष्ट्या सुंदर फुलले पाहिजे. अनामिक कवींचा सुंदर विचार आहे, ते म्हणतात..‌
“घडले काल जे घडायचे, होईल उद्या जे व्हायचे.. हाच एक क्षण हाती तुझ्या, गमावल्यावर ना रडायचे..”
‘उद्या काही होणार नाही, काल गेले ते येणार नाही, आणि आज स्वस्थ बसला तर, तुझ्या हातून काही होणार नाही.‌’                                                                          

लेखक –
डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे 
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, 
संत साहित्य उपासक, शेगाव.
संपर्क – ९४०४५५३५०५

डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
Author: डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे

लेखक डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील, से. नि. शिक्षण केंद्रप्रमुख असून, संत साहित्याचे व्यासंगी उपासक आहेत. महाराष्ट्रातील विविध दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रे, मासिके आणि वार्षिक अंकात त्यांचे ४५० लेख प्रकाशित झाले आहेत. संत साहित्याचे मंथन करून, शब्दांकित केलेला चिंतन ग्रंथ ही प्रकाशित झालेला आहे. सखाश्री आध्यात्मिक साहित्य मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा प्रदान केलेली आहे. त्यांचे साहित्य लेखन सेवा कार्यआजही सातत्याने सुरूच आहे. एम. ए. एम. एड् साहित्य विशारद, पीएच.डी. उच्च पदवी प्राप्त मिरगे सर, उत्कृष्ट किर्तन प्रवचन कार असून, त्यांनी विदर्भ क्षेत्रात गेल्या ४० वर्षात, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, ५०० च्या वर कीर्तन, प्रवचन सेवेचे कार्यक्रम सादर केले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार २००१, महामहिम राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते, त्यांना प्राप्त झाला असून, भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. शिक्षण, साहित्य, सामाजिक सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल, महाराष्ट्र शासन, विविध सेवाभावी संस्था, समाज मंडळांच्या वतीने, एकूण १८ दर्जेदार पुरस्कारांनी ते गौरवान्वित आहेत.. महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा, उत्कृष्ट लेखन कार्याचा दर्जेदार, अध्यात्मिक वांग्मय पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. विनम्र, सेवाभावी, गुणवंत, प्रज्ञावंत, उत्कृष्ट अध्यापक म्हणून ते आजही समाजप्रिय आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा