पदवीधर निवडणुकीत मतदार भाजपच्या पाठीशी उभे राहतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास; पश्चिम, दक्षिण-पश्चिम, उत्तर नागपुरातील मेळाव्यात साधला संवाद

SHARE:

नागपूर – पदवीधर मतदारसंघातील मतदारांनी सातत्याने भाजपवर विश्वास दाखवला आहे. एका निवडणुकीतील पराभवाने हा विश्वास कमी होत नाही. यंदाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासोबत पदवीधर मतदार ठामपणे उभे राहतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

पश्चिम, दक्षिण-पश्चिम, उत्तर नागपुरातील मेळाव्यात ना. नितीन गडकरी यांनी संवाद साधला. पश्चिम नागपुरात जवाहर विद्यार्थी गृह, दक्षिण पश्चिम येथे सुरेंद्र नगरमधील नासा मैदानावर तर उत्तर नागपुरातील टेका येथील प्रल्हाद लॉन येथे मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी खासदार मायाताई इवानते, भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार संजय भेंडे, माजी आमदार संदीप जोशी, माजी आमदार नाना श्यामकुळे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी, गिरीश देशमुख, श्रीकांत आगलावे, विष्णू चांगदे, प्रभाकरराव येवले, वीरेंद्र कुकरेजा आदींची उपस्थिती होती.

गडकरी म्हणाले, ‘आपल्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. सुशिक्षित मतदारांचा कौल आपल्या पक्षाच्या बाजूने कायम रहावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण केलेल्या कामाची माहिती योग्य प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचवावी लागेल. कामांच्या जोरावरच मते मागायची आहेत.’

यावेळी ना. नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. ‘सिंचनाच्या अनुशेषाचा मुद्दा विदर्भातील आमदारांनी विधानपरिषदेत लावून धरला. त्यानंतर मोठा निधी विदर्भाला मिळाला. विधानपरिषदेत पदवीधरांसोबतच, सिंचन, रोजगार आदी विषयांवर प्रश्न मांडणे आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा