नागपूर विभाग पदवीधर निवडणूक : पदवीधर आणि नोकरदारांच्या प्रश्नांसाठी आझाद समाज पार्टीचे नितीन नागदेवते रिंगणात..

SHARE:

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर, पदवीधर व पदवीधर नोकरदारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना विधान परिषदेत ताकदीने मांडण्यासाठी आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे पुरस्कृत उमेदवार नितीन महेश नागदेवते यांनी निवडणुकीच्या मैदानात जोरदार मुसंडी मारली आहे.

पूर्वीच्या लोकप्रतिनिधींकडून मतदारांच्या अपेक्षा भंग : नितीन नागदेवते
आपली भूमिका मांडताना नितीन नागदेवते यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. “पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी विधान परिषदेत पदवीधरांचे आणि पदवीधर नोकरदारांचे प्रश्न सोडवण्याऐवजी पूर्णतः दुर्लक्ष केले असून, स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्याकडेच त्यांचा कल राहिला आहे,” असा थेट आरोप नागदेवते यांनी केला आहे. आमदार अभिजित वंजारी यांच्यावर त्यांनी प्रत्यक्ष आरोप केलेत. तसेच पदवीधरानीं पैश्याच्या आमिषाचे प्रलोभण न स्वीकारता आझाद समाज पार्टी च्या पुरस्कृत उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मत द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

त्याचबरोबर नवीन महाविद्यालये मंजूर करून घेणे, मागासवर्गीय (एससी, एसटी, ओबीसी) विद्यार्थ्यांकडून ॲडमिशनच्या वेळी बळजबरीने सर्व फी वसूल करून घेणे अशा अनेक प्रकारच्या शोषणाला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. यासर्व समस्या भवनात जाऊनच सुटतील व त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

६ जिल्ह्यांत पसरलेला मतदारसंघ; हायटेक व थेट प्रचारावर भर
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा ६ मोठ्या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. या विशाल क्षेत्रात आझाद समाज पार्टीचे भक्कम संघटन व कार्यकर्ते सक्रिय आहेत. या मतदारसंघात एकूण २,५५,६०३ नोंदणीकृत मतदार असून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाने आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि थेट संपर्काचा मार्ग अवलंबला आहे. व्हॉट्सॲप मेसेज, टेक्स्ट मेसेज आणि व्हॉईस कॉलद्वारे मतदारांपर्यंत थेट संदेश पोहोचवला जात आहे. मतदारांशी वैयक्तिक भेटी, विविध पदवीधर गट आणि सामाजिक संघटनांशी प्रत्यक्ष चर्चा करून प्रचार राबवला जात आहे. या संपूर्ण मोहिमेला मतदारांकडून उत्तम व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा नागदेवते यांनी केला आहे.

१. भविष्यातील मुख्य अजेंडा आणि आश्वासने :विधान परिषदेत पदवीधरांचा बुलंद आवाज बनण्यासाठी नितीन नागदेवते यांनी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करण्याचे वचन दिले.

२. शासकीय स्पर्धा परीक्षा पारदर्शक आणि निश्चित वेळापत्रकानुसार (Time-table) आयोजित करणे.

३. पदवीधरांसाठी मोफत अध्ययन केंद्र, वसतिगृह सुविधा आणि रोजगाराभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करने.

४. शिक्षण क्षेत्रातील वाढते व्यापारीकरण व खाजगीकरणाला तीव्र विरोध, तसेच उच्च व खाजगी संस्थांमध्ये आरक्षण नियमानुसार लागू करणे.

५. सामाजिक न्याय, आदिवासी विभाग आणि बहुजन कल्याण विभागामार्फत दिली जाणारी परदेशी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे.

६. अंशकालीन पदवीधरांची जुनी सेवा ग्राह्य धरून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.

७. शासनामधील कंत्राटी व मानधनावरील नियुक्ती पद्धतीला पूर्ण विरोध दर्शवणे.

८. निवडणूक आयोगाच्या कामात शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर गुंतवून ठेवल्यामुळे त्यांच्या मूळ शैक्षणिक कामात अडथळा निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणून बेरोजगार पदवीधरांना या कामात मानधनावर संधी देणे.

९. शासकीय वसतिगृहांची इमारत दुरुस्ती, विद्यार्थ्यांच्या भौतिक सोयी-सुविधा आणि जेवणाच्या दर्जाबाबत आमूलाग्र सुधारणा करणे.

क्रमांक १ च्या पसंतीक्रमाचे आवाहन
पदवीधर व नोकरदारांच्या समस्या सोडवून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीत क्रमांक १ च्या पहिल्या पसंतीक्रमाचे मत देऊन विजयी करण्याचे भावूक आवाहन आझाद समाज पार्टी (विदर्भ पूर्व) चे अध्यक्ष आणि उमेदवार मा. नितीन नागदेवते यांनी केले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा