नागपूर : भारतीय शिक्षण मंडळ संचालित नवयुग विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय (कोठी रोड, महाल, नागपूर) येथे दिनांक ४ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांमध्ये शिवछत्रपतींचा इतिहास आणि दुर्ग संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने ‘सिंहगड किल्ला प्रदर्शनाचे’ साकरण्यात आला होता. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सिंहगड किल्याची उभारणी केली. खासदार सांस्कृतिक महोत्सव व आमदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत शिवकालीन किल्लेस्पर्धा मधील सहभाग म्हणून या किल्याची निर्मिती करण्यात आली.

विद्यार्थ्यांचा प्रभावी सहभाग आणि सादरीकरण
या विशेष किल्याचे आज आयोजन समिती च्या वतीने परीक्षण करण्यात आले. यावेळी मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा व शिक्षक वृंदाचा सक्रीय सहभाग पाहायला मिळाला. सिंहगड किल्याची माहिती आणि त्यामागील ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्वरी पौनीकर हिने अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने सादर केले. याशिवाय, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हार्दिक इखार व त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून अत्यंत जोशपूर्ण वातावरणात सादर केली. या सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगावर काटा आणला असून संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला.

मान्यवरांच्या हस्ते पाहणी व परीक्षण
‘दुर्ग जागृती किल्ले स्पर्धा आयोजन समिती’तर्फे या प्रदर्शनाची पाहणी व परीक्षण करण्यात आले. या प्रसंगी समितीचे परीक्षक म्हणून संयोजक निरजा पाटील, अविनाश अटकुलवार, रवींद्र सूर्यवंशी व आशिष एरंडे हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि ऐतिहासिक प्रेमाचे भरभरून कौतुक केले.

शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य
विद्यार्थ्यांच्या या यशस्वी उपक्रमामागे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाथ्रडकर आणि पर्यवेक्षिका सौ. वर्षा भुजाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांविषयी व इतिहासाविषयी प्रचंड उत्साह व देशभक्तीची भावना पाहायला मिळाली.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.





