
सांगली : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. रविंद्र चव्हाण आज सांगली जिल्ह्यातील विटा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी माजी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत वक्तव्य केलं. त्यांच्या संबंधित वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात काही ठिकाणी वाद होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी केलेलं वक्तव्य हे एकनाथ शिंदे यांना टोला लागवणारं तर नव्हतं ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. “दोन नंबर तो नंबरच असतो, त्याला काही किंमत नसते”, असं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केलं आहे.
रविंद्र चव्हाण भाषणात काय म्हणाले?
“मला २०१४ चा क्षण आठवतो. आम्ही २०१४ ला फार आनंदी होतो. कारण २०१४ भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा आम्ही सर्व खूश होतो. आम्ही सर्वजण सभागृहात जेव्हा गेलो, तेव्हा याच भागातील असणारे उमदे नेतृत्व जे आज आपल्यामध्ये नाहीत. आर आर आबा आज आपल्यात नाहीत”, अशी भावना रविंद्र चव्हण यांनी व्यक्त केली.
“आर आर पाटील एकदा सभागृहात उभे राहिले. त्यांनी बोलायला चालू केलं. त्यांनी बोलायला चालू केल्यानंतर ते चांगल्या चांगल्या लोकांची बोलती बंद करायचे. ते कदाचित त्यांचं ते शेवटचं भाषण असेल. त्यानंतर त्या काळात ते आजारी पडले होते. पण तो दिवस आजच्या या सभेला फार महत्त्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलं की, मी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीमध्ये बरेच वर्ष, बरीच मोठी पदं भूषविली. पण ही पदं भूषविली आणि मी हाच प्रयत्न केला की, नंबर एक होण्याचा. पण मी काही नंबर एक होऊ शकलो नाही. मी नंबर दोनच राहिलो”, अशी आठवण रविंद्र चव्हाण यांनी सांगितली.
“ते भाषण बघा. ते भाषण बघण्यासारखं, एकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं की, बाबांनो तुम्हाला म्हणून सांगतो, नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोनला काहीच किंमत नसते, असं त्यांनी म्हटलं. मी देवा शप्पथ सांगतो. त्यांच्या भाषणाचा तो व्हिडीओ आजही व्हायरल होतो”, असा दावा रविंद्र चव्हाण यांनी केला.
“मला आठवतं तेव्ही मी वारंवार सांगतो. आबांवरती तरी विश्वास ठेवा. हो तर हो म्हणा. बरोबर आहे का नाही? सगळ्यात शेवटी एकच गोष्ट लक्षात घ्या. जो भी हैं वह देवा भाऊ ही हैं. आप आपके लोगों को बतावो देवा भाऊ सबका भाऊ हैं”, असं हिंदीत रविंद्र चव्हाण म्हणाले.
“कसं असतं राजकारणात असं म्हटलं जातं की, काय कारवं आणि कुणासाठी करावं? असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र सांगितला आहे. सबका साथ आणि सबका विकास हा मंत्र त्यांनी सांगितला. या मंत्राप्रमाणे भाजपने विटा नगर परिषदेला पैसे दिले”, असं रविंद्र चव्हाण म्हणाले.





