सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाला कोर्ट परिसरातच वकिलांनी चपलांनी दिला चोप…

SHARE:

नवी दिल्ली – देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर वकील राकेश किशोर याने बूट फेकल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर सरन्यायाधीशांनी राकेश किशोरला माफ केलं होतं. मात्र मंगळवारी दिल्लीच्या कडकडडूमा कोर्टातील वकिलांनी वकील राकेश किशोर याला चपलांनी चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राकेश किशोर हा वकिली गणवेशात दिसत आहे. काही लोक त्याला चपलेने मारहाण करताना दिसतात. मारहाण होत असताना राकेश किशोर हा ‘तुम्ही मला का मारत आहात?’ असे विचारत आहे. त्यानंतर काही वेळाने तो ‘सनातन धर्म की जय’ अशा घोषणा देतानाही दिसतो. या घटनेनंतर न्यायालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून राकेश किशोर याला जमावापासून बाजूला काढले आणि बाहेर सुरक्षितपणे पाठवले. यामुळे पुढील अनर्थ टळला.
माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे सरन्यायाधीशपदावर कार्यरत असताना ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या कोर्टरूममध्ये राकेश किशोर या वकिलाने बूट फेकला होता. थेट न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर झालेल्या या कृत्याचे पडसाद देशभर उमटले होते. या कृतीवर सामाजिक आणि विद्वान वर्गातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता, कारण हा प्रकार भारतीय न्यायसंस्थेचा अवमान करणारा मानला गेला होता.
आता हेच वकील राकेश किशोर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. वकील राकेश किशोर यांना दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयाच्या परिसरात वकिलांनी चपलांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून राकेश किशोर याला जमावापासून बाजूला काढले. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, राकेश किशोर याला झालेल्या मारहाणीवर समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
काही लोक हिंसेला हिंसेने उत्तर देणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे, ज्याने माजी सरन्यायाधीशांचा अवमान केला, त्याला मिळालेली ही वागणूक योग्यच आहे, असे म्हणणारेही अनेकजण आहेत. एकंदरीत, माजी सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याच्या घटनेनंतर आता वकिलाला कोर्ट परिसरात झालेल्या मारहाणीमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा