
रायगड : नवी मुंबईतील ऐरोली परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विमानतळ सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या अदानी ग्रुपच्या वरिष्ठ मॅनेजरसह चौघांच्या कार फोडून चोरट्यांनी लॅपटॉप आणि मोबाइल लंपास केल्याची घटना ऐरोली सेक्टर १० येथे रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अदानी ‘ग’ ग्रुपमध्ये वरिष्ठ मॅनेजर पदावर कार्यरत असलेले रमेशकुमार सुंदरम हे घराच्या शोधासाठी ऐरोलीत आले होते. मित्राच्या प्रतीक्षेत असताना ते एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले होते. यावेळी त्यांनी रस्त्यालगत हॉटेलबाहेर आपली कार उभी केली होती. सुमारे तासाभरानंतर ते कारजवळ आले असता, कारची मागील काच फुटलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कारची तपासणी केली असता, लॅपटॉप बॅग आणि त्यामध्ये असलेला पासपोर्ट चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे या लॅपटॉपमध्ये मुंबई विमानतळाच्या कामकाजाशी संबंधित गोपनीय माहिती असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. त्यामुळे ही चोरी केवळ आर्थिक नुकसानीपुरती मर्यादित न राहता, सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत गंभीर मानली जात आहे. जर ही माहिती चुकीच्या हाती लागली, तर तिचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच ठिकाणी उभ्या असलेल्या दुसऱ्या कारचीही काच फोडण्यात आली होती. या कारमधून गुरुप्रसाद डांगरे, सचिन देवघरे आणि अमित साळवी यांचे लॅपटॉप आणि मोबाइल फोन चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. अवघ्या काही वेळात दोन कार फोडून मौल्यवान साहित्य चोरण्यात आल्याने ऐरोली परिसरातील सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर सर्व पीडितांनी तातडीने रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली. डांगरे यांच्या लॅपटॉप बॅगमधील मोबाइलद्वारे काही काळ चोरट्याचे लोकेशन दिसत होते. ही माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. मात्र, पोलिसांकडून सुमारे दोन तास उशिरा प्रतिसाद मिळाल्याने तोपर्यंत चोरट्यांनी मोबाइल बंद केल्याची खंत पीडितांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या घटनेमुळे नवी मुंबईतील वाहनफोडीच्या वाढत्या घटनांसह विमानतळाशी संबंधित माहितीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.





