मुंबईत धुरक्याचं साम्राज्य, उंच इमारती धुक्याच्या पडद्याआड; तर निफाडमध्ये पारा ५ अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद…

SHARE:

मुंबई : मुंबईत हवेत गारवा कायम आहे. त्याशिवाय धुक्याचं प्रमाणही वाढलं आहे. मुंबईत शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर धुरक्याचं साम्राज्य पसरल्याचं पाहायलं मिळालं. वरळी भागातील उंच इमारती दाट धुरक्याच्या पडद्याआड गेल्या. वरळीत हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक १६२  एवढा नोंदवण्यात आला आहे.

निफाड गारठले; पारा ५  अंशांवर
निफाड तालुक्यात शुक्रवारी कुंदेवाडी येथील गहू कृषी संशोधन केंद्रात यंदा प्रथमच ५.४  अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. नाशिक, मालेगावचेही तापमान घसरले. नाशिकचे तापमान ७.४ , तर मालेगावचे तापमान ८  अंशांपर्यंत घसरले. निफाडच्या तापमानाने १२ डिसेंबरनंतर (५.७ ) नीचांकी तापमानाची नोंद केली आहे.

उत्तर भारतावर दाट धुक्याची चादर
उत्तर भारतात पंजाबपासून बिहारपर्यंत शुक्रवारी सकाळी दाट धुक्याची चादर पसरली. त्यामुळे संपूर्ण गंगेच्या मैदानात दृश्यमानता कमी झाली. या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिल्लीसाठी ‘रेड ॲलर्ट’ जारी करत रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

‘आयएमडी’ च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपग्रहाच्या प्रतिमांमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, ईशान्य मध्य प्रदेश आणि बिहार या भागावर दाट धुक्याचे आच्छादन दिसून आले आहे. शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता उत्तर प्रदेशातील आग्रा, बरेली, सहारनपूर आणि गोरखपूर; पंजाबमधील अंबाला, अमृतसर, भटिंडा, लुधियाना आणि आदमपूर, दिल्लीतील सफदरजंग, हरयाणातील अंबाला, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, बिहारमधील भागलपूर आणि झारखंडमधील डाल्टनगंज येथे दृश्यमानता शून्य मीटर नोंदवली गेली.

धुक्यामुळे १७७ उड्डाणे रद्द
उत्तर भारतात पंजाबपासून बिहारपर्यंत संपूर्ण गंगेच्या मैदानात शुक्रवारी सकाळी दाट धुक्याची चादर पसरली. दृश्यमानता कमी झाल्यामुळे दिल्ली विमानतळावरून १७७  उड्डाणे शुक्रवारी रद्द करण्यात आली, तर 500 हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. हवामान विभागाने दिल्लीसाठी ‘रेड ॲलर्ट’ जारी करत रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी चार विमाने गुरुवारी (१८  डिसेंबर) रद्द करण्यात आली. त्यापैकी दोन विमाने दाट धुक्यामुळे रद्द झाल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना ऐन वेळी विमान रद्द झाल्याचा त्रास सहन करावा लागल.

Leave a Comment

अधिक वाचा