मुंबई – शुक्रवारी महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अनेक ठिकाणी भाजप- शिंदेसेनेची सत्ता आली. मात्र मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्ता गाजवणार्या शिवसेना ठाकरे गटाला यंदा धक्का बसला आहे. फारच कमी अंतरराने त्यांचं मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. दरम्यान या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला जबर धक्का बसला आहे. १८ महापालिकेत त्यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही. यामुळे आता १८ महापालिकेत तुतारीचा आवाज बंद झाला आहे.
अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात ‘किंगमेकर’ ची भूमिका बजावणाऱ्या या पक्षाला काही ठिकाणी तुटपुंज्या जागा मिळाल्या, तर अनेक शहरांमध्ये तर खातंही उघडता आलं नाही. शरद पवार यांच्या पक्षाला मुंबईत १ जागा मिळाली आहे. तर ठाण्यात १२, कल्याण-डोंबिवली १, भिवंडी-निजामपूर १२, पुणे ३, सांगलीत ३, छत्रपती संभाजीनगरात १ आणि अकोल्या ३, अशा एकूण ३६ जागा मिळाल्या आहेत.
तर नवी मुंबई, उल्हासनगर, मिरादृभाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, नांदेड-वाघाळा, परभणी, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, जालना आणि इचलकरंजीत त्यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही.
याशिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवारांना मोठा धक्का बसला आहे. येथे दोन्ही पक्षांची यूती असतानाही अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. पुण्यात अजित पवार गटाला २७ जागा आणि शरद पवार गटाला 3 जागा मिळाल्या. तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला ३७ तर शरद पवार यांच्या पक्षाला केवळ एक जागा मिळाली. या दोन्ही महापालिकेत भाजपला बहुमत मिळाले.
राज्यातील महापालिका निवडणूकात दोन्ही राष्ट्रवादीला मोठा धक्का बस बसल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची आज बारामतीतील शरद पवार यांचे गोविंद बाग येथील निवासस्थानी बंद दाराआड चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र चर्चेचा तपशील मिळाला नाही.





