नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल त्यांच्या ट्रथ सोशल या प्लॅटफॉर्मवरुन याबाबत घोषणा केली. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील दोन्ही देशातील व्यापार करारावर शिक्कामोर्तब केलं. दोन्ही देशातील व्यापार करार दोन्ही देशांच्या संबंधासाठी एक निर्णायक पाऊल मानलं जात आहे. अमेरिकेनं भारतावर लादलेलं २५ टक्के टॅरिफ १८ टक्क्यांवर आणलं गेलं आहे.
भारत अमेरिका व्यापार करारानंतर काय स्वस्त होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा व्यापार करार ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. अमेरिकनं उत्पादनांवरील टॅरिफ कमी करुन ते शून्य टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विश्वास दिलाय, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. यामुळं येत्या काळात भारतीय बाजारात अमेरिकन वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. हा व्यापारी करार भारतीय कंपन्यांसाठी देखील फायदेशीर मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेड इन इंडिया उत्पादनांना अमेरिकन बाजारात पोहोचता येईल, असं म्हटलं. दोन्ही देशात व्यापार आणि गुंतवणुकीला मजबुती मिळेल, असंही मोदी म्हणाले.
एनडीटीव्ही प्रॉफिट रिसर्चच्या रिपोर्टनुसार व्यापार करारामुळं अमेरिकन वस्तूंच्या भारतातील दरात घसरण होईल. आयात शुल्क कमी झाल्यानं त्याच्या किमतीवर परिणाम होईल. कृषी क्षेत्रातील डाळी, डेअरी उत्पादनं आणि प्रक्रिया केलेलं अन्न याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देखील याचा परिणाम दिसून येईल. लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक गॅजेटस आणि कम्पोनेंटस या सारख्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी झाल्यानं त्याच्या दरात देखील घसरण होईल. पॅकेज्ड फूड, होम अप्लायन्सेस सारख्या वस्तूंच्या दरात घसरण होईल.
भारतीय निर्यातदारांना फायदा
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारामुळं भारतीय निर्यातदारांना देखील फायदा होणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राला अमेरिकेनं टॅरिफ घटवल्याचा फायदा होईल. दागिने क्षेत्रात स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते भारताची निर्यात क्षमता आणखी मजबूत होण्यास अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा फायदा होणार आहे.
दरम्यान, एल्युमिनिअम, तांब्यावर असलेले अमेरिकनं निर्बंध लागू आहेत. यावर ५० टक्के टॅरिफ आहे. इतर ऑटो कंपोनेंटस वर २५ टक्के शुल्क कायम राहण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात मर्यादित दिलासा देण्यात आल आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये व्यापार करार आणि टॅरिफ कमी करण्यापूर्वी फोनवर चर्चा झाली होती.




