मुंबई – भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर वादाच्या भोवर्यात अडकल्या आहेत. त्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करताना रुग्ण नसताना आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना गर्दीच्या दादर मार्केटमध्ये सायरन सुरू ठेवून रुग्णवाहिका फिरवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधान आले असून तेंडुलकर यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. याप्रकरणी आता मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षता तेंडुलकर यांनी मागील काही वर्षात दादर परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. दादरमधील फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी असल्याच्या संशयातून त्यांनी एकाला मारहाण केल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यानंतर आता त्यांनी फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी दाखवण्यासाठी चक्क एका रुग्णवाहिकेचा वापर केला.
धक्कादायक म्हणजे, या रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नसताना किंवा कोणतीही आपात्कालीन स्थिती नसताना दादर मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी मोठ्या आवाजात सायरन वाजवत रुग्णवाहिका फिरवण्यात आली.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरला झाला आहे. ज्यात रुग्णवाहिकेत स्वतः अक्षता तेंडुलकर आणि त्यांचे काही कार्यकर्ते दिसून येत आहेत. त्यामुळे भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर करण्यात आला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाहतूक नियमांनुसार, रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना किंवा इमर्जन्सी नसताना सायरन वापरणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचा वापर केल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन ठरते आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते.
या प्रकरणाची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली असून, उपलब्ध व्हिडिओ आणि पुराव्यांच्या आधारे कारवाईची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपत्कालीन सेवांचा असा वापर केल्यास सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो, अशी केली जात आहे.





