सोलापूर – शनिवारी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १३५ पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. आज निकाल जाहीर होणार आहेत. यादरम्यान एक हैराण करणारा प्रकार पुढे आला. सोलापुर जिल्हयातील मोहोळमध्ये एका धाब्यवर ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सोलापूरमध्ये शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी मतदान पार पडलं. मतदाननंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँगरुमकडे रवाना झाले. मात्र रात्री ११ ते १२ च्या दरम्यान दोन ईव्हिएम सोलापूरच्या मोहोळमधील एका ढाब्यावर सापडल्यानं खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणला. घटनेची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. उमेश पाटलांना सापडलेल्या दोन्ही मशीन राखीव असल्याचं स्पष्टीकरण उपजिल्हाधिका-यांनी दिलं असलं तरी उमेश पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या प्रकारावरून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले की ईव्हीएम मशीन नेण्यासाठी एसटी असते किंवा एखादे वाहन नेमण्यात आलेले असते. ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडले आता काय कारणे देणार? ईव्हीएम बद्दल वारंवार शंका उपस्थित होत आहे. यात निवडणूक आयोग काही तरी करून सत्ताधारी पक्षाला मदत करत असतो, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.
या प्रकारावर उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख म्हणाले कि मशीन ढाब्यावर आढळणे हा प्रकार दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणी आम्ही संबंधितांवर कारवाई करणार आहोत. आढळून आलेल्या ईव्हीएम मशीन अतिरिक्त होत्या. त्या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या नाहीत. अशी सारवासारव त्यांनी केली. उपजिल्हाधिकारी म्हणाले कि झोनल अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त दोन मशीन ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, वाहन चालक आणि अधिकारी यांच्यातील संवादाच्या अभावामुळे हा प्रकार घडला असावा. त्या मशीन स्ट्राँग रुममध्ये स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनखाली चक्क टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची ठेवून जादूटोणा केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. ईव्हीएम मशीन खाली चक्क लिंबूला टाचण्या टोचून बिबा ठेवल्याने मतदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या प्रकारावर उपजिल्हाधिकारी म्हणाले कि ईव्हीएम हे जादूटोण्यावर चालत नाही. हा प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणात केंद्रप्रमुखांची चूक नसून कोणीतरी खोडसापणे हा प्रकार केल्याचे दिसते. असे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.





