नवी दिल्ली – पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने शनिवारी पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल पलटवून पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र इतर तीन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली. विशेष सीबीआय न्यायालयाच्या निकालाविरुद्ध आरोपींनी दाखल केलेल्या अपिलांवर सुनावणी केल्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
यावर निर्णयावर रामचंद्र छत्रपती यांचे पुत्र अंशुल छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि हायकोर्टाचा निर्णय एक मोठा धक्का असून या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. बीबीसी हिंदीशी बोलताना अंशुल छत्रपती यांनी न्यायालयाच्या निर्णयाला निराशाजनक म्हटले. ते म्हणाले कि आम्ही २४ वर्षांपासून न्यायालयात हा खटला लढत आहोत. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आमचा पराभव झाला आहे, पण आम्ही हार मानलेली नाही. आम्ही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ.
राम रहीम यांना कोणत्या कारणांवरून निर्दोष मुक्त करण्यात आले असे विचारले असता, अंशुल छत्रपती म्हणाले की त्यांच्याकडे अद्याप निकालाची संपूर्ण प्रत नाही आणि संपूर्ण आदेश वाचल्यानंतरच त्यांना उलट करण्याचा आधार कळेल. सुरुवातीपासूनच या प्रकरणात सहभागी असलेले वकील लेखराज धोत म्हणाले की सीबीआयच्या प्रदीर्घ तपासानंतर आणि सबळ पुरावे सादर केल्यानंतर राम रहीम यांना दोषी ठरवण्यात आले, परंतु न्यायालयाच्या निर्णयाने पीडितांची निराशा झाली आहे.
ते म्हणाले कि उच्च न्यायालयाने या प्रकरणात गोळीबार करणारे आणि कट रचणारे कृष्ण लाल यांच्या शिक्षेचे समर्थन केले आहे. याचा अर्थ तपासात इतके पुरावे होते. तरीही, डेरा प्रमुखाची निर्दोष मुक्तता दुःखद आहे. पहिल्या खटल्यात ज्याप्रमाणे सीबीआयने पुरावे जोडून आपली बाजू जोरदारपणे मांडली, त्याचप्रमाणे सीबीआय उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
द इंडियन एक्सप्रेसच्या अनुसार, अंशुल म्हणाले कि उच्च न्यायालयाने इतर आरोपींच्या शिक्षेला मान्यता दिली. पण आमचा लढा डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांच्याविरुद्ध होता. मुख्य गुन्हेगार गुरमीत राम रहीम सिंग आहे, ज्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. जर आपण शत्रुत्वाबद्दल बोललो तर गोळीबार करणाऱ्यांचा किंवा डेरा व्यवस्थापकाचा माझ्या वडिलांशी काहीही संबंध नव्हता. त्यावेळी माझे वडील फक्त गुरमीत राम रहीम सिंग यांचे बींग उघड करत होते. जर त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले असेल तर ते निश्चितच आमच्यासाठी एक मोठा धक्का आहे.
अंशुल यांनी वृत्तपत्राला सांगितले की मी दोन दशकांहून अधिक काळापासून ही कायदेशीर लढाई लढत आहे. इतक्या प्रभावशाली व्यक्तीचा सामना करणे सोपे नसते. परंतु माझ्या आशा अबाधित आहेत. खटला सुरू होण्यापूर्वीच आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला आरोपीला दोषी ठरवून कुटुंबाला दिलासा दिला होता, परंतु आता, हायकोर्टाच्या निर्णयानंतर कायदेशीर लढाई सुरूच राहील.
माहित असावे की रामचंद्र छत्रपती हे सिरसा संध्याकाळाचे दैनिक ‘‘पूरा सच’’ चे संपादक होते. साध्वीच्या बलात्काराचा अहवाल प्रकाशित केल्यानंतर २००२ मध्ये छत्रपतींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात २०१९ मध्ये, पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम यांना दोषी ठरवले.
यापूर्वी, ऑगस्ट २०१७ मध्ये, पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयानेही राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले होते. या प्रकरणाची बातमी देणारे पत्रकार रामचंद्र छत्रपती हे पहिले होते. उल्लेखनीय म्हणजे राम रहिम बलात्कार प्रकरणात रोहतकच्या सुनारिया तुरुंगात २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.





