अमरावती – आज महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आणि सामाजिक क्रांतीच्या प्रणेती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन ‘नवजगरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती’ ने म. न. पा. प्राथमिक व उच्च माध्यमिक जेवड शाळा, पवन नगर, गोपाल नगर अमरावती येथे सकाळी ८ वाजता संपूर्ण सन्मानाने, आदरांजलि देऊन त्यांच्या कार्यांना स्मरण करत कार्यक्रम घेतला.
सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाजात स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून महिलांच्या मुक्तीचा मार्ग दाखवला. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद व स्त्रीदमनाविरुद्ध लढा दिला.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांच्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिक्षण देणे हा मोठा सामाजिक गुन्हा मानला जात होता. तरीही सावित्रीबाई यांनी अपमान, दगडफेक व सामाजिक बहिष्कार सहन करूनही शिक्षणाची मशाल विझू दिली नाही.
सावित्रीबाई फुले यांनी विधवा पुनर्विवाह, बालविवाहाविरोध, स्त्रियांचे अधिकार आणि शोषित-वंचित समाजाच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून अनेक अनाथ मुलांचे प्राण वाचवले. समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, स्वाभिमान आणि समानतेचा संदेश देणे हे त्यांचे आयुष्यभराचे ध्येय होते.
१८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली असताना रुग्णांची सेवा करताना त्यांना संसर्ग झाला आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. मानवतेची सेवा करताना प्राण अर्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे जीवन आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे.

त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त समाजाने शिक्षण, समानता आणि स्त्री-पुरुष समतेच्या मूल्यांना बळकट करण्याचा संकल्प करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. या कार्यक्रमामध्ये जेवड शाळेच्या चंचल दातीर मॅडम, फसाटे सर, समितीचे गणेश मुंधरे, सचिव सतीश ढोरे, प्रियंका मुंधरे, रुपेश वानखडे, निलु दास, रुपाली खोडके, आकाश माहोरे, विक्रांत सातारकर, राहुल खोडके, रिगवेदी देशमुख, धनंजय देशमुख सह नाना रमत्कार, सत्या मुंधरे व जेवड शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.





