नवी दिल्ली – आखाती देशातील इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे देशभरात इंधन आणि गॅस पुरवठ्याची टंचाई निर्माण झाली असून अनेक ठिकाणी लोकांनी गॅससाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहेत. इतकेच नाही तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे देशभरात अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली आहे. या युद्धाचा परिणाम आता औषध उद्योगावरही जाणवत आहे. कच्च्या मालाच्या किमती ३० टक्के वाढल्याने भारतात औषधांच्या किमती झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, भारतात औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमती गेल्या दोन आठवड्यात अंदाजे ३० टक्के वाढल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या औषध उद्योगावर दबाव निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही वाढ प्रामुख्याने इराण युद्धानंतर जागतिक शिपिंग नेटवर्कमध्ये झालेल्या व्यत्ययामुळे झाली आहे. कंटेनर जहाजांच्या कमतरतेमुळे चीनकडून भारतात होणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
भारतीय औषध उद्योग चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
इराणसोबतच्या सध्याच्या युद्धामुळे शिपिंग मार्गांची कमतरता निर्माण झाली आहे, ज्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. मालवाहतुकीचे दर केवळ दुप्पटच झाले नाहीत तर आता शिपमेंटवर ४,००० ते ८,००० पर्यंत अतिरिक्त अधिभार आकारला जात आहे.
औषध कंपन्या आता कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा भार थेट ग्राहकांवर टाकत आहेत. कच्चा माल आणि फार्मास्युटिकल सॉल्व्हेंट्सच्या किमती २० -३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तज्ञ मेहुल शाह म्हणतात की सॉल्व्हेंट्स पेट्रोकेमिकल्सपासून बनवले जातात आणि मध्य पूर्वेतील चालू संघर्षामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे औषध उत्पादन खर्चावर दडपण आले आहे.
कंपन्या सामान्यतः जस्ट-इन-टाइम इन्व्हेंटरी मॉडेलवर काम करतात, म्हणजेच त्यांच्याकडे कच्च्या मालाचा मोठा साठा नसतो. तज्ञांनी इशारा दिला आहे की जर युद्ध आणखी १०-१५ दिवस चालले तर केवळ औषधांच्या किंमती वाढतीलच असे नाही तर बाजारपेठेत आवश्यक औषधांच्या उपलब्धतेवर संकट येऊ शकतो.
फार्मा उद्योजक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीश जैन म्हणाले की सध्याच्या किंमत नियंत्रण प्रणाली अंतर्गत कंपन्या इतकी मोठी वाढ सहन करू शकत नाहीत, म्हणून राष्ट्रीय फार्मा किंमत प्राधिकरणाने औषधांच्या किमतींमध्ये मर्यादित वाढ करण्याची परवानगी दिली पाहिजे.
फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष दिनेश दुआ म्हणाले की इराण युद्धामुळे शिपिंग मार्ग विस्कळीत होत आहेत आणि मालवाहतुकीचा खर्च वाढत आहे, ज्यामुळे लवकरच आवश्यक औषधांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो.
हे लॉजिस्टिक्स संकट आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळींनाही धोका निर्माण करत आहे. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि ओमानसारखे देश परवडणाऱ्या औषधांसाठी भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. जर युद्ध आणखी १० ते १५ दिवस सुरू राहिले तर औषधांच्या किमती वाढतील. याचा परिणाम गरीब आणि वंचित घटकांवर होईल. औषधांच्या किमती वाढल्यास गरीब लोकांना उपचारासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. जेव्हा कि अगोदरच सर्वसामान्य जनता महागाईचा सामना करत आहे. एलपीजी गैस आणि खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत.





