प्रधानमंत्री महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारल्यास गॅस टंचाई दूर होईल; संजय राऊतांचा खोचक टोला

SHARE:

नवी दिल्ली – अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाची फटका आता सामान्य नागरिकांना बसू लागला आहे. देशभरात व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून पेट्रोल-डिझेलचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान शिवसेना (उबाठाचे) नेते संजय राऊत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जुन्या विधानाचा संदर्भ देत खोचक टोला लगावला आहे. प्रधानमंत्री महान वैज्ञानिक आणि संशोधक आहेत, त्यांनी नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारल्यास गॅस टंचाई दूर होईल, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात निर्माण झालेल्या तीव्र गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत, मुंबईतील मिठी नदीवर गॅस प्रकल्प उभारण्याचा खोचक सल्ला दिला. पंतप्रधान मोदी हे एक मोठे संशोधक आहेत, त्यांनीच नाल्यातून गॅस निर्मितीचा मार्ग दाखवला होता, आता त्यांनी तो प्रयोग सिद्ध करून दाखवावा, असे राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत म्हणाले कि मोदींच्या संकल्पनेतील या गॅस प्रकल्पाचे उद्घाटन मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर करण्यात यावे. मिठी नदीवर अशा प्रकारचा उद्योग उभा राहिल्यास त्यातून देशभर गॅस निर्मितीची केंद्रे सुरू होतील. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाईपची व्यवस्था शिवसेना स्वतः करायला तयार आहे, फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी आवश्यक ते अनुदान मंजूर करावे आणि त्याचं उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदी यांनाच बोलवावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

देशात सगळ्यात मोठा विषय सध्या इराण इस्राएल युद्धामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती हा आहे. देशात गॅसची मोठी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. मोदी सरकारकडून सांगण्यात आले होते की, या युद्धाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. पण सरकारने जनतेला दिलेले हे आश्वासन फोल ठरले. मुंबईसारख्या शहरात गॅस टंचाईमुळे ३० टक्के रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद आहेत.

व्यावसायिक गॅसपुरवठा ठप्प झाल्याने वाहन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा आणि सांगली येथील इंजिनिअरिंग उद्योग पूर्णपणे बंद आहेत. चाकणमधील वाहन उद्योग अडचणीत आला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी यांचं भारताला १०० वर्ष मागे घेऊन जाण्याचं स्वप्न आहे, ते पूर्ण करत आहेत. त्यांची
संस्कृती हीच आहे की विज्ञान नष्ट करुन नाल्यातून गॅस निर्माण करायचा. पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधताना राऊत यांनी अमेरिकेच्या प्रेस सेक्रेटरींच्या एका विधानाचा हवाला दिला. अमेरिका म्हणते की भारत एक उत्तम अभिनेता आहे, हेच आज सिद्ध होत आहे, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या जागतिक प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विज्ञानाला बगल देऊन नाल्यातून गॅस काढण्याच्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान होत असून, सर्वसामान्य जनता महागाई आणि टंचाईच्या चक्रव्यूहात अडकली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे मांडले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी १० ऑगस्ट २०१८ रोजी जागतिक जैवइंधन दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात गॅस निर्मितीसंदर्भात नाल्यातून गॅस निर्मितीचा एक अजब प्रकार सांगितला होता. बायोइंधन कसं तयार करता येईल यासंदर्भात बोलताना मोदींनी नाल्यातून ऊर्जा उत्पादनाबाबतचा चाहावाल्याचा किस्सा सांगितला. एक चहावाला शेजारच्या नाल्यातून निघणाऱ्या गॅसचा वापर करून चहा बनवत होता. तो नाल्यातून नळी काढून ती थेट स्टोव्हला जोडून गॅस वापरत होता, असं वक्तव्य मोदींनी केलं होतं. यावरूनच आता देशभरात गॅस टंचाईदरम्यान संजय राऊत यांनी पीएम मोदींना खोचक टोला लगावला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा