मध्य प्रदेश – भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला घरगुती सामान खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर पडली असता पाच जणांनी तिचे अपहरण केले आणि नंतर मोहरीच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. जेव्हा आरोपींच्या लक्षात आले की महिलेने त्यांना ओळखले आहे आणि ती पकडली जाऊ शकते, तेव्हा त्यांनी तिचा गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यात बांधून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. ही घटना १६ मार्च रोजी सुरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने राज्यातील कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थि झाले आहे.
या घटनेनंतर १८ मार्च रोजी सुरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोई गावाजवळ, रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद प्लास्टिकची पिशवी दिसल्याने वाटसरूंमध्ये खळबळ उडाली होती. बॅगेत एका महिलेचा मृतदेह होता. माहिती मिळताच, पोलीस पथके, न्यायवैद्यक तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात असे दिसून आले की हा एक सामान्य मृत्यू नसून एक निर्घृण हत्या होती. जेव्हा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली, तेव्हा त्यांना समजले की ही तीच महिला होती जिच्या हरवल्याची तक्रार १६ मार्च रोजी आतर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे, हे प्रकरण सोडवणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते. मात्र एका हवालदाराच्या तीक्ष्ण नजरेने घटनास्थळी विशिष्ट प्रकारचे गवत आणि झाडांची पाने ओळखली. हा एक महत्त्वाचा सुगावा ठरला, ज्यामुळे पोलिसांना हत्या कोणत्या परिसरात किंवा शेतात झाली असावी हे निश्चित करता आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, डीआयजी डॉ. असित यादव यांनी आरोपींसाठी प्रत्येकी १० रूपयांचे बक्षीस जाहीर केले, ज्यामुळे पोलीस पथकाचे मनोधैर्य वाढले आणि तपासाला गती मिळाली.
अटक केलेल्या आरोपीने चौकशीदरम्यान जे काही उघड केले ते धक्कादायक आहे. मुख्य आरोपी, सूरज शर्मा, संजू शर्मा, दिनेश शर्मा हरिओम शर्मा आणि अनिल यांच्यासोबत एका विहिरीजवळ दारूची पार्टी करत होता. दरम्यान, सूरज बाजारात गेला आणि त्याला ती महिला दिसली. नशेत असलेल्या सूरजने परत येऊन आपल्या मित्रांना त्या महिलेबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी महिलेचे अपहरण करण्याचा कट रचला.
महिला घरी परत येत असताना, या पाचही जणांनी तिला घेरले आणि जबरदस्तीने जवळच्या मोहरीच्या शेतात ओढून नेले. तिथे त्या सर्वांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिच्या किंकाळ्या आणि आपली ओळख उघड होण्याच्या भीतीने आरोपींनी गळा दाबून महिलेची हत्या केली. रात्रीच्या अंधारात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी, त्यांनी तो एका पोत्यात पेंढा आणि गवत भरून, दोन मोटरसायकलवर लादला, रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि पळून गेले.
माहिती देणाऱ्यांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी घेराव घातला. दोन आरोपींना रायपुरियाच्या शेतातून आणि उर्वरित तिघांना दिडोना गावातून अटक करण्यात आली. पोलिसांनी खाक्या दावताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. सध्या, सर्व पाचही आरोपी तुरुंगात आहेत.





