अजित पवार अपघात प्रकरणी विमान कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; आमदार रोहित पवार यांच्या संघर्षाला यश

SHARE:

मुंबई – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. यानंतर २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसेच २६ फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. आता आमदार रोहित पवार याच्या लढ्याला अखेर यश आलं असून लियरजेट ४५ विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकच्या बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

रोहित पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७३(१) अंतर्गत ‘झिरो एफआयआर’ नोंदवला. यापूर्वी त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि २६ फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दोन्ही ठिकाणी एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. पुणे सीआयडीने केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले होते.

रोहित पवारांच्या तक्रारीनुसार, ही दुर्घटना अपघात नसून उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारा गुन्हेगारी कट असू शकतो. तक्रारीत विमान सुरक्षेच्या नियमांचे पद्धतशीर उल्लंघन, देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गंभीर निष्काळजीपणा, नोंदींची बनावट कागदपत्रे तयार करणे, विमान ५००० तासांच्या ‘टाइम बिफोर ओव्हरहॉल’ मर्यादेच्या अत्यंत जवळ असतानाही व्यावसायिक वापरासाठी चालू ठेवणे, अधिकृत नोंदींमध्ये उड्डाण तास कमी दाखवणे; प्रत्यक्षात ८  हजार तासांपेक्षा जास्त उड्डाण झाल्याची शक्यता, या गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.

२४  फेब्रुवारी २०२६ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (क्ळब्।) ने सादर केलेल्या सुरक्षा लेखापरीक्षण अहवालात व्हीएसआर व्हेंचरची काही विमाने निष्काळजीपणामुळे उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले होते आणि ती विमाने ग्राउंड करण्यात आली होती. रोहित पवार यांनी या प्रकरणाचा स्वतंत्र, सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या तांत्रिक चौकशीबरोबरच गुन्हेगारी तपासाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे हा एफआयआर पाठविण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. आता महाराष्ट्रात गुन्हा दाखल होऊन त्यानुसार तपास होणार का, असा प्रश्नही रोहित पवारांनी मीडियाशी बोलताना उपस्थित केला.
मुंबईहून बारामतीकडे येणारे व्हीटी-एसएसके नोंदणी असलेले बॉम्बार्डियर लियरजेट ४५ विमान २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४३ ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास कोसळले. हे विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे चालवले जात होते. या दुर्घटनेत अजित पवारांसह सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

अधिक वाचा