मुंबई – एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी १८ मार्च रोजी अटक केल्यानंतर भोंदू अशोक खरातचे नवीन कारनामे समोर येत आहेत. त्याच्यावर आतापर्यंत लैंगिक छळाचे सहा गुन्हे दाखल झाले आहेत. तर आता सातवा गुन्हा शिर्डीत दाखल झाला आहे. गुंगीचं औषध देऊन चार वेळा रेप केल्याची तक्रार पीडितने पोलिसांत केली आहे.
पीडित तरुणीचे कुटुंब शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा, असे म्हणत अशोक खरातकडे गेले होते.जागा बाधित आहे, दोन वर्षे घर बांधू नका, असे सांगत अशोक खरात कुटुंबाला पुन्हा बोलावून घेत होता. तिसऱ्या भेटीत मुलीनं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अशी विचारणा कुटुंबीयांकडून करण्यात आली. कुठल्या फिल्डमध्ये शिक्षण घेऊ, चांगली नोकरी कुठे लागेल असा प्रश्न तरूणीने करताच मला हिच्याशी काही बोलायचे आहे, असे सांगून खरातने तिच्या आई-वडीलांना केबिन बाहेर काढले.
त्यावेळी त्याने मला विचारले की तुझे कॉलेज कसे चालू आहे. असे बोलून त्याने मला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पीण्यासाठी दिले ते पाणी पिले असता ते मला थोडे बेचव लागले, त्यानंतर त्याने काहीतरी मंत्र बोलून तो ग्लास माझे डोक्यावर ठेवून मला डोळे बंद करायला सांगितले, आणि मला तो बोलेल तसे मंत्र बोलायला लावले व माझे पाठीमागे येऊन उभा राहीला. त्यानंतर आपोआप माझे डोके जड पडू लागले आणि मी तो सांगेल त्याप्रमाणे वागू लागले.
त्यावेळी पहिले त्याने मला त्याच्या मिठीत घेतले आणि माझ्या डोक्यावरून, छातीवरून हात फिरवला आणि बोलला की मी महादेवाचा अवतार आहे, माझेकडे दैवी शक्ती आहे, मी तुझे खुप चांगले करीयर घडवील. फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तू कर असे बोलून मला मंत्र बोलायला लावले. आणि नंतर माझे लैंगिक शोषण केले. मी विरोध केला असता तो म्हणाला की तू जर विरोध केला आणि जर कोणाला सांगितले तर मी माझेकडील दैवी शक्तीने तुझे आणि तुझ्या घरच्यांचे आयुष्य उध्वस्त करून टाकीन. तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यु होईल अशी भिती घातली. त्यामुळे मी घाबरून तो सांगेल त्याप्रमाणे वागले. जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान वारंवार अशोक खरात अत्याचार करत होता, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
अशोक खराच्या काळ्या कारणाम्याचा तपास आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात सुरू आहे. या तपासात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिर्डीतील एका गुन्ह्यात नीरज जाधव विरोधात तपास करत असताना शिर्डी पोलिसांच्या हाती तो पेन ड्राईव्ह लागला अन भोंदू अशोक खरातच्या काळ्या
कारनाम्याचे बिंग फुटले. शिर्डी पोलिस तपासाच्या दिशेने काय करतात, याची माहिती भोंदू खरातपर्यत पोहचत होती. त्यानुसार तो सूत्र हालवत होता. नीरजकडून शिर्डी पोलिसांना मिळालेला पेन ड्राईव्ह काही करून मिळवायाचा अन ते प्रकरण रफादफा करण्याचा ए प्लॅन खरातने आखला. त्यासाठी मुंबईतून तीन आयएएस अधिकाऱ्यांना बोलावले गेले.
मिरगाव येथे काही काळ बैठक केल्यानंतर एक अधिकारी नाशिककडे परतला, तो पुढे जाणार होता. तर दोन अधिकाऱ्यांना घेऊन भोंदू खरात शिर्डीत आला. शिर्डीत दाखल गुन्ह्यात नीरजला गुंतवयाचे अन तो पेन ड्राईव्ह घेवून रफादफा करण्याचा कट शिर्डीतील बैठकीत शिजला. त्यासाठीच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव तंत्राचा प्रयोग केल्याचे ऐकिवात आहे. मात्र शिर्डी पोलिसांनी याला दाद दिली नाही.
शिर्डी पोलिसांनी ज्या ज्या महिलांचे जबाब घेतले, त्यातील एक महिलेला हाताशी धरून तपास अधिकारी अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे विरोधातच गुन्हा दाखल करण्याचा बी प्लॅन तयार केला गेला. मात्र मुंबईत वरिष्ठांकडे धाव घेत वाघचौरे यांनी खरात फाइल्सची माहिती दिली. त्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली झाल्या अन त्याच रात्री भोंदूबाबा खरातला अटकही केल्या गेली.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळ, बलात्कार आणि महिलांचे शोषण यासंबंधीचे आतापर्यंत ७ गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.





