अशोक खरातवर सरकारची कृपा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटींचा निधी मंजूर; २०१८ चा जीआर आला समोर

SHARE:

मुंबई – महिला अत्याचार प्रकरणी संशयित कॅप्टन खरातच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. भोंदू अशोक खरातने दीड दशकांपूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशानेश्वर मंदिराची स्थापना केली होती. आता याच मंदिरासाठी तत्कालिन महायूती सरकारने २०१८ मध्ये दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. याबाबतचा जीआर आता समोर आला आहे. विशेष म्हणजे, सर्वपक्षीय नेत्यांनी आणि मंत्र्यांनी हा निधी मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अशोक खरात प्रकरणाच्या तपासादरम्यान ३१ मार्च २०१८  रोजीचा एक सरकारी जीआर समोर आला आहे. यावेळी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या जीआरनुसार, मंदिराच्या परिसरातील विविध विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिराच्या परिसराचा कायापालट करण्यासाठी खालील कामे करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते.
यात भव्य भक्तनिवासाचे बांधकाम करणे, ईशान्येश्वर मंदिराचे सुशोभीकरणे, परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि चेंजिंग रूमची व्यवस्था करणे ईशान्येश्वर मंदिरात भव्य सभामंडपाचे बांधकाम, विद्युतीकरण आणि लँडस्केपिंग या कामाचा समावेश होता. दीड कोटींपैकी २५ लाख रूपयांचा निधी तात्काळ मंजूर करण्यात आला होता. हा जुना जीआर समोर आल्याने एका भोंदूबाबाच्या धार्मिक स्थळासाठी एवढा मोठा निधी कसा मंजूर करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भोंदू खरातने दीड दशकांपूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशानेश्वर मंदिराची स्थापना केली होती. या मंदिर परिसरात त्याची २१ एकर जागा आहे. या ठिकाणी त्याचे आलिशान फार्म हाऊस आहे. या बांधकामावेळी भोंदूबाबाने जाम नदीच्या पात्रात अतिक्रमण केल्याची स्थानिकांची तक्रार आहे. फार्महाऊस उभारताना खरातने ग्रामपंचायतीची परवानगी घेतली होती की नाही, याबद्दलही शंका आहे. खरातकडे बडे मंत्री, राजकीय नेत्यांचे येणे-जाणे असल्याने ग्रामस्थ खरातला बडे प्रस्थ मानत होते. त्यामुळे त्याच्या विरोधात कोणी बोलण्याचे धाडस केले नव्हते. मात्र आता त्याचे काळी कृत्ये समोर आल्यानंतर ग्रामस्थही बोलू लागले आहेत.

खरातच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याचा नाशिक येथील बंगला, कार्यालय आणि सिन्नर येथील फार्म हाऊसची झाडाझडती घेतली. त्याच्या घरातून पिस्तुल, जिवंत काडतुसे, आठ लाखांची रोकड, दोन लॅपटॉप, कोट्यवधीच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. खरातने पत्नी, मुलगी आणि नातेवाईकांच्या नावांवर नाशिक, सिन्नर तसेच अहिल्यानगरमधील शिर्डी, राहता येथे जमीन, भूखंडात मोठी गुंतवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या मालमत्तेचे मूल्य तब्बल २०० कोटींच्या आसपास असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment

अधिक वाचा