नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडीओ देणारा, घेणारा आणि व्हॉटसअप ग्रुपवर व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे नाशिक पोलिसांनी म्हटले आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे नाशिकमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे पीडित महिलांची ओळख उघड होत आहे. पीडित महिलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात नाशिकमधील सिडको आणि सातपूर मधील एका ग्रुपच्या ॲडमिनसह काही सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सिद्धार्थ रामोशे, रमिज शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे, साहिल सैय्यद यांच्यासह इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे त्यांची ओळख उघड होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर पीडित महिलांचे व्हिडीओ शेअर करणे हा गंभीर गुन्हा आहे. यामुळे संबंधित महिलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा प्रकारे व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी महिलांचे लैंगिक शोषण झाल्याच्या आरोपांवरून आधीच गुन्हे दाखल आहेत. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात भेंदू खरात विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
नाशिक पोलिसांनी इशारा दिला आहे की, अशोक खरात प्रकरणातील पीडितांचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांची माहिती गोळा केली जात आहे. याप्रकरणात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या व्हिडीओ व्हायरल प्रकरणात नाशिक महानगरपालिकेतील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणार्यांविरोधात अहिल्यानगरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरमधील कोपरगावात ३ जाणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात अधिक तपास नाशिक पोलिस करत आहेत.





