पुच एआयसोबतचा २५ हजार कोटी रुपयांचा करार केला रद्द; टिकेची सर्वत्र झोड उठल्यानंतर योगी सरकारचा यु-टर्न

SHARE:

उत्तर प्रदेश – कंपनीच्या विश्वासार्हतेवर टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेश सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) स्टार्टअप पूच एआय सोबतचा २५ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार रद्द केला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने म्हटले आहे की २३ मार्च रोजी स्वाक्षरी झालेला हा सामंजस्य करार रद्द करण्याचा निर्णय, प्रमाणित कार्यपद्धतीनुसार कराराचे पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आला.

उत्तर प्रदेश सरकारने, त्यांच्या नव्याने स्थापन केलेल्या गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा एजन्सी, ‘इन्व्हेस्ट यूपी’च्या माध्यमातून म्हटले आहे की एसओपीनुसार गुंतवणूकदाराला आवश्यक तपशील मागण्यात आला होता, परंतु ते वेळेवर तपशील पुरवण्यात अयशस्वी ठरले. तपासात असे उघड झाले की प्रकल्पाच्या व्याप्तीनुसार गुंतवणूकदाराकडे पुरेसे भांडवल आणि विश्वसनीय आर्थिक संबंधांचा अभाव होता. राज्य सरकारच्या निर्देशानुसार, सामंजस्य करार आजपासून रद्द करण्यात येत आहे. आता कोणतेही हक्क किंवा जबाबदाऱ्या शिल्लक नाहीत. राज्य सरकारने पुढे असेही म्हटले आहे की पारदर्शकता आणि प्रशासनातील सर्वोच्च पातळीवरील सचोटीच्या हितासाठी हा सामंजस्य करार रद्द करण्यात आला आहे.

उल्लेखनीय म्हणजे २३ मार्च रोजी झालेल्या या कराराचा प्रचार मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी त्यांच्या एका पोस्टमधूनही केला होता. त्यांनी दावा केला होता की या उपक्रमामुळे शासन अधिक मजबूत करेल, नवकल्पनांना चालना देईल आणि तरुणांसाठी भविष्यात संधी निर्माण करेल. त्यांनी लिहिले होते की पुच एआयसोबत २५,००० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे राज्यात एआय पार्क, मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर, एआय कॉमन्स आणि एआय विद्यापीठाची स्थापना होईल.

मात्र त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या या पोस्टवर एक्सवरील वाचकांनी एक नोट जोडली, ज्यामध्ये म्हटले होते की ही कंपनी केवळ एक वर्ष जुनी स्टार्टअप आहे आणि तिची वार्षिक कमाई ५०  लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यानंतर विरोधक आणि इतर तज्ज्ञांकडून या करारावर तीव्र टीका करण्यात आली. या प्रकरणात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी सरकारवर निशाणा साधला.

अखिलेश यादव यांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटले की या सरकारने ‘लॉ अँड ऑर्डर’चाच एन्काऊंटर केला आहे. घोषणेनंतर अवघ्या एका दिवसातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुच एआयच्या सामंजस्य कराराबाबत मागे हटत सांगितले की, इन्व्हेस्ट यूपीकडून करण्यात आलेला एमओयू सविस्तर तपासणी आणि प्रकल्प मूल्यांकनात यशस्वी ठरल्यास पुढे नेण्यात येईल, अन्यथा तो रद्द करण्यात येईल.
स्टार्टअप पूच एआय पुचचे संस्थापक सिद्धार्थ भाटिया यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या मूल्यांकनाशी असहमती दर्शवली, मात्र कंपनीची एकूण कमाई सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. भाटिया यांनी असेही सांगितले की या करारात करदात्यांचा कोणताही पैसा समाविष्ट नाही आणि तो ‘बाह्य गुंतवणूक भागीदारांच्या’ मदतीने टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाईल.

कंपनीने यापूर्वी २० अब्ज डॉलर्सच्या ‘परप्लेक्सिटी’ या एआय कंपनीला विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा करणारी बातमी प्रसारित केली होती, याचा हवाला देत अनेकांनी २५,००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार अंमलात आणण्याच्या कंपनीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.

माहित असावे कि भाटिया यांनी या महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती आणि त्या भेटींचे फोटो त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा