बुलढाणा – जिल्ह्यात महायुतीमधील दोन आमदारांचा वाद विकोपाला गेला आहे, तर महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. पाठीत खंजीर खुपसणे आम्हाला जमत नाही. माहिती अधिकाराचा वापर करून दबाव टाकण्याचे धंदे मी करत नाही, ते कोण करते आहे हे तुमच्या घरात चौकशी करा, अशी आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महालेंवर टीका केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीमधील दोन आमदारांमधील वाद वाढलेला दिसत आहे. शिवसेनेचे शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद वाढत चालला आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना, भाजप आमदार श्वेता महाले यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आमदार संजय गायकवाड हे माहिती अधिकाराचा धाक दाखवून आणि सरपंचांवर दबाव टाकून पक्षात प्रवेश करून घेत असल्याचा दावा श्वेता महालेंनी केला होता. याला उत्तर देताना संजय गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
संजय गायकवाड म्हणाले, आमचे काम सरळ आहे. छातीला छाती भिडवायची आणि विषय संपवायचा. पाठीत खंजीर खुपसणे आम्हाला जमत नाही. चिखलीच्या आमदार म्हणतात की मी दबाव आणतोय, पण असे धंदे मी कधीच करत नाही. हे कोण करते आहे. याची तुम्ही तुमच्या घरातच चौकशी करा. आम्ही चिखलीत आमचा पक्ष वाढवण्यासाठी आणि खासदारांचे मताधिक्य वाढवण्यासाठी आलो आहोत.
चिखलीत माझे असंख्य कार्यकर्ते आहेत, पण माझ्याबद्दल पोस्ट केल्यावर त्यांना धमकावले जाते. शिवसैनिकांनी भाजप आमदाराला ५-६ वेळा निवडून आणले आहे. आता आमचे कार्यकर्ते काम घेऊन गेले की त्यांना पक्षात प्रवेश घ्या असे सांगितले जाते. शिवसेना चिरडायला निघत असाल, तर तो त्रास दूर करायला आम्ही आहोत.
कोणाकोणाला जेलमध्ये घालणार आणि कोणाला धमकावणार, हे आता आम्ही पण पाहणार आहोत. चिखलीच्या आमदार काय करतात, हे सर्व आमच्या कानावर आहे. मी काही घरात बसलेला आमदार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात माझे नाव आहे, अशा शब्दांत गायकवाड यांनी आमदार श्वेता महालेंवर टीका केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात राज्यातील महायुतीतील दोन आमदारांचा अंतर्गत वाद वाढत चालला आहे.





