भोंदू अशोक खरात चालवायचा हवाला रॅकेट; बडे अधिकारी करायचे मदत, तपासातून आले समोर

SHARE:

मुंबई – भोंदू अशोक खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण या गंभीर आरोपांबरोबरच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे, आणि यासाठी बड्या अधिकाऱ्यांनी त्याला मदत केल्याचे देखील उघड झाले आहे. भोंदू अशोक खरात ला अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून दररोज त्याचे नव नवीन काळे कारनामे समोर येत आहे.

ज्योतिषी बनत त्याने अनेकांची लुबाडणूक केल्याचा, पैसे कमावल्याचेही प्रकार उघड झाले. याच तपासादरम्यान आता भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. भोंदू अशोक खरात हा हवाला रॅकेट चालवत असे. परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हा हवाल्याचा वापर करत होता. या पैशांची दुबईपर्यंत देवाण-घेवाण होत होती. यात त्याला अनेक बडे भक्त व अधिकारी मदत करत असल्याचा संशय आहे. याबाबत एसआयटीला ठोस पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

खरातने आध्यात्मिक कार्याच्या आडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचा संशय असून, या व्यवहारांमध्ये करचुकवेगिरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या नावावर तसेच बेनामी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता उभारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता आयकर विभाग आणि जीएसटी विभागही सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची, बँक खात्यांची, गुंतवणुकीची तसेच मालमत्तेची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

भोंदू अशोक खरातने अंकशास्त्राच्या आधारावर भविष्य सांगण्याच्या बहाण्याने १५० हुन अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची पोल खोल झाली आहे. भोंदू अशोक खरात विरोधात आतापर्यंत एकूण आठ एफआयआर दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हणजेच आता खरात प्रकरणात १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ८  गुन्हे हे लैंगिक अत्याचार संबंधित असून २ गुन्हे फसवणुकीचे आहेत. खरात विरोधात तक्रारी ओघ सुरूच असून फोनद्वारे त्याच्या विरोधात १००  पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आता खरात आणखी गोत्यात सापडत चालला आहे.

Leave a Comment