माजी प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना अटक; नेपाळच्या राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

SHARE:

नेपाळ – देशाच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. नेपाळचे माजी प्रधानमंत्री केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना पोलिसांनी अटक केली आहे. २०२५ च्या जेन-झी आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचार आणि दडपशाहीच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. नवनियुक्त प्रधानमंत्री बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ही मोठी कारवाई करण्यात आली. यामुळे नेपाळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, पोलिसांनी शनिवारी पहाटे ५  च्या सुमारास भक्तपूरच्या गुंडू येथील त्यांच्या निवासस्थानातून केपी शर्मा ओली यांना ताब्यात घेतले. माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना सूर्यविनायक येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. काठमांडू व्हॅली पोलिसांचे प्रवक्ते ओम अधिकारी यांनी एएफपीला सांगितले की गृह मंत्रालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर आणि जारी केलेल्या वॉरंटनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

नेपाळमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये सोशल मीडिया बंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरून तरुणांनी तीव्र आंदोलनं केली होती. सरकारने यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट् अॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देशव्यापी बंदी घातली होती. यावरून नेपाळमधील तरुणांचा संताप उफाळून आला. याशिवाय, २०.६ टक्क्यांचा उच्च बेरोजगारी दर, भ्रष्टाचार आणि नेपो बेबी ट्रेंडमध्ये दिसून आलेली श्रीमंत व गरीब यांच्यातील तीव्र तफावत यामुळे तरुण संतप्त झाले होते.

या चळवळीदरम्यान झालेल्या हिंसाचारात एकूण ७७  जणांचा बळी गेला आणि सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले. आंदोलकांनी संसद पेटवून दिली होती. या उग्र आंदोलनामुळे मंत्र्यांना हेलिकॉप्टरनं पळून जावं लागलं होतं. या प्रकरणात झालेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालात केपी शर्मा ओली, आणि रमेश लेखक यांच्यावर आंदोलनात बेजाबदारपणे वागल्याचा ठपका ठेवण्यात आला.

या चळवळीच्या दबावामुळे मार्च २०२६ मध्ये मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्या. बलेंद्र शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने बहुमत मिळवले. तरुणांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे बालेन शाह सत्तेवर आले. आता त्यांचे सरकार जुन्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा