पूरग्रस्तांच्या मदत निधीत २.५ कोटींचा घोटाळा; केबीसीत ५० लाख जिंकलेल्या महिला तहसीलदाराला अटक

SHARE:

भोपाळ – मध्यप्रदेशच्या श्योपुर जिल्हात वर्ष २०२१ मध्ये आलेल्या पुरानंतर सरकारकडून पीडितांना आर्थिक मदत देण्यात आली होती. मात्र पूरग्रस्तांच्या मदत निधीवर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना अटक करण्यात आली आहे. तहसीलदार अमिता सिंह तोमर यांनी १२७ बनावट खात्यांमध्ये जवळपास २.५७  कोटी रुपये वळवल्याचा आरोप आहे. तहसिलदार अमिता सिंह तोमर २०११ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या केबीसीच्या पाचव्या सिझनमध्ये ५० लाख रुपये जिंकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे २.५  कोटी रुपयांच्या पूर मदत घोटाळ्यात कथित सहभागाप्रकरणी गुरुवारी तत्कालीन महिला तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की बडोदा तहसीलमध्ये २०२१ साली झालेल्या एका घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर तोमर यांना शिवपुरी कारागृहात ठेवण्यात आले आहे.

अमिता सिंह तोमर २०२१ मध्ये बडोदा तहसीलच्या तहसीलदार होत्या. याच काळात पूर मदत घोटाळा उघडकीस आला. पूरानंतर ७९४ लाभार्थ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करायचा होता. मात्र, तपासात असे उघड झाले की अनेक बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यात आला. यामध्ये अमिता सिंह यांचा सहभाग उघड झाला. यातील अनेक खाती त्यांच्या तहसीलबाहेर होती.

बडोद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अवनीत शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ग्वाल्हेरमधील चंद्रवडनी नाका येथील त्यांच्या घरातून तोमर त्यांना अटक केली. तोमर या विजयपूरच्या तहसीलदार होत्या, परंतु जिल्हाधिकारी अर्पित वर्मा यांनी बुधवारी त्यांची पदावरून हकालपट्टी केली.

त्यांनी अशीही माहिती दिली की तोमर यांनी यापूर्वी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत ११०  जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून आतापर्यंत २२ पटवारी आणि एका तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा