अशोक खरातने नेत्यांचे नंबर डमी नावाने मोबाईलमध्ये सेव्ह केल्याचा संशय; सरकारी वकिलांचा कोर्टात दावा

SHARE:

मुंबई – भोंदूबाबा अशोक खरातला रविवारी नाशिकमधील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने खरातला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे अशोक खरात एक एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहणार आहे. दरम्यान या सुनावणीत सरकारी वकिलांनी एक महत्त्वाची माहिती न्यायालयात दिली. भोंदूबाबा अशोक खरातने मोबाईलमध्ये राजकीय व्यक्तींचे नंबर डमी नावाने आणि सांकेतिक भाषेत सेव्ह केल्याचा संशय आहे, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.

या सुनावणीत सरकारी वकिलांनी सांगितले की अशोक खरात हा चौकशीत पोलिसांना सहकार्य करत नाही. महिलांच्या अत्याचाराचा विषय निघताच तो उडवाउडवीची उत्तरे देतो. तसेच अशोक खरात याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम फॉरेन्सिक टीमकडून सुरु आहे. आम्ही या मोबाईल डेटाची क्लोन कॉपी घेतली आहे. या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह करण्यात आल्याची शक्यता आहे.

कोणत्या नावाने, कोणाचा नंबर सेव्ह आहे, हे खरातच सांगू शकणार आहे. काही नावे खरातने सांकेतिक भाषेतही सेव्ह केली असण्याची शक्यता तपास पथकाने व्यक्त केली आहे. त्यात काही राजकीय व्यक्तींच्या मोबाईल नंबरचा समावेश असण्याचा संशयही आहे. खरात पीडित महिलांना जे द्रव पाजत होता, त्याबाबत तसेच आरोपीचे इतर जे साथीदार आहेत त्यांची आणि खरातच्या जंगम मालमत्तेसंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी देखील पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

मात्र अशोक खरातचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडी वाढवून देण्यास विरोध केला. मोबाईल जप्त केला आहे. क्लोन कॉपी मिळाली आहे. असे असताना पुन्हा कोठडीची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेवटी सरकारी बाजूचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अशोक खरातची तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली.

अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. खरातच्या दरबारी ३९ आमदार रांगा लावत असल्याचा खुलासा दिपक केसरकर यांनीच केला आहे. केसरकर यांनी या आमदारांची यादी जाहीर करावी. यासंदर्भात पेन ड्राइव्ह बाहेर आला तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसेन. त्यामुळे सरकार अडचणीत येईल, असा गौप्यस्फोट काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

दमरम्यान लहान मुलीच्या शोषणाच्या प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला होता. कारण मोठ्या लोकांना वाचवायचे होते. आता खरात यांच्याबाबत काहीही घडू शकते, आणि अनेक पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. अमावस्येच्या दिवशी मोठे नेते अंधारात आपली पापे लपवण्यासाठीच जात असावेत. अशा भेटींची चौकशी झाली पाहिजे, असेही विजय वडेवट्टीवार म्हणालेत.

Leave a Comment

अधिक वाचा