मुंबई – शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पटेल आणि तटकरे यांनी पक्षाच्या संविधानात बदल करून अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला. हे पाऊल प्रफुल्ल पटेल यांना अमर्याद अधिकार देण्यासाठी असल्याचे रोहित पवार म्हणाले.
आमदार रोहित पवार म्हणाले कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संविधानात आणखी काही बदल केल्याची बाब समोर आली आहे. पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन संविधानातून काढून टाकण्यात आले आहेत. एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानात एकूण ७ फ्रंटल सेल नमूद करण्यात आल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या संविधानात केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या सेलचा समावेश असल्याचं उघड झालं आहे.
काही दिवासांपूर्वी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना बदलत संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केल्याचा गंभीर आरोप केला होता. रोहित पवार म्हणाले होते कि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तसेच ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि आणखी एका व्यक्तीच्या सह्या आहेत. या सह्या कशावर त्यांनी केल्या आहेत, एकतर त्यांनी खोटे सांगितले की त्यांची घटना जे आहे, प्रत्येक पक्षाची एक घटना असते. हे बदलण्यात आले आहे. त्यात जे कार्याध्यक्ष असतील त्यांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले जातील. अजितदादांना जाऊन फक्त १८ दिवस झाल्यानंतर हे पत्र सुनेत्रा काकींना न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता इलेक्शन कमिशनला देण्यात आलं.
यानंतर सुनेत्रा काकींनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून त्यात पक्षाकडून करण्यात आलेला पत्र व्यवहार रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत रोहित पवारांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना बदलत संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता.
या वादादरम्यान रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील बॅनरवर पक्षाचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार आणि विद्यमान अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना वगळण्यात आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा रायगडच्या इंदापूर येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातील बॅनरवरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. पक्षाचा कार्यक्रम असताना बॅनरवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि दिवंगत ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा फोटो लावण्यात न आल्याने अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली होती. आता रोहीत पवारांनी पटेल आणि तटकरेंवर पक्षाच्या संविधानात बदल करून अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल काढून टाकल्याचा आरोप केला आहे.





