२५ वर्षांपूर्वीच्या जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीसह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल; खडसे बाप-लेकीचा पाय खोलात

SHARE:

जळगाव – शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे गोत्यात सापडले आहेत. एकनाथ खडसे यांनी खरेदी खतामध्ये खाडाखोड करून महार वतनाची आपली जमीन त्यांची मुलगी शारदा खडसेंच्या नावे करून घेतल्याच्या आरोपात खडसे बाप लेकीच्या विरोधात ॲट्रोसिटीसह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर गावातील रहीवासी चमेलीबाई तायडे यांच्या तक्रारीवरून बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील जमीनी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली २००२ मध्ये विकत घेण्यात आल्या होत्या. यामध्ये गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन मानपूर येथील चमेलीबाई तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. फिर्यादीनुसार, एकनाथ खडसे यांनी या परिसरात ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ सुरू करण्याचे आमिष दाखवून ही जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. जमिनीचा चांगला मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात रोजगार देण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.

तक्रारदार चमेलीबाई तायडे यांनी आरोप केला आहे की त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन हा जमिनीचा व्यवहार करण्यात आला. केवळ ५१ हजार रुपये आगाऊ देऊन आणि सर्व वारसदारांचे अंगठे घेऊन बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात ही खरेदी प्रक्रिया पार पडली होती. ज्या जमिनीवर ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ उभा राहणार होता, अनेक वर्षे उलटूनही तिथे कारखाना उभारला गेला नाही. २०२५ मध्ये तायडे कुटुंबाने या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून, ती शारदा एकनाथ खडसे यांच्या नावावर असल्याचे आढळून आले.

११  फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ खरेदीखताची अधिकृत प्रत तपासण्यात आली, तेव्हा त्यात फेरफार झाल्याचे उघड झाले. मूळ कागदपत्रांमध्ये जिथे ‘तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ असे नाव नोंदवण्यात आले होते, तिथे खाडाखोड करून शारदा एकनाथ खडसे असे नाव घूसवण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दाद मागितली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर, चमेलीबाई तायडे यांच्या तक्रारीवरून एकनाथ खडसेंबरोबर त्यांची कन्या शारदा खडसे, दुय्यम निंबधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि दस्तावर खाडाखोड करणाऱ्यांविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात फसवणुकीबरोबर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसारही गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खडसे बाप-लेकीचा पाय खोलात गेला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आरोप फेटाळून लावले आहे. एका वृत्तवाहीनीसी बोलताना एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. आपल्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. २५ वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहारावर आता तक्रार होणे संशयास्पद असून पोलिसांवर राजकीय दबाव आणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप खडसेंनी केला. या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नाही. मुलीने जी जमीन खरेदी केली आहे तो खासगी व्यवहार आहे.ही जमीन महार वतनाची नाही तर 101 वर्गवारीची आहे. याठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या असताना चमेलीबाई तायडे यांचीच 25 वर्षांनंतर तक्रार का? यामागे सूडबुद्धीचे राजकारण आहे, असे खडसे म्हणाले.

Leave a Comment

अधिक वाचा