मुंबई – काही दिवासांपूर्वी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मोठ्या नेत्यांची गुपिते दडपण्यासाठी अशोक खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा केला होता. यानंतर आता त्यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि उपसभापती नीलम गोऱ्हे गेले पाच ते सहा वर्षे अशोक खरात याच्याकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती, असा गौप्यस्फोट तृप्ती देसाई यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत केला.
अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. खरातच्या दरबारी 40 आमदार रांगा लावत असल्याचे समोर आले आहे. आपले राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक राजकीय मंडळी त्याला भेटत असत. या प्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा आणि राज्य महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला.
आता याची झळ शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठोपाठ पक्षाच्या आमदार तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. निलम गोर्हे यांनी आमदारकी आणि मंत्रिपद मिळेल का, असे भविष्य जाणून घेण्यासाठी खरातची नाशिकमध्ये भेट घेतली होती. यातील दोन वेळा त्या भोंदूबाबाच्या कार्यालयात गेल्या, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या की नीलम गोऱ्हे गेली पाच ते सहा वर्ष या भोंदू अशोक खरातकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? कारण त्यांचे खरातशी संबंध आहेत. त्या खरातकडे जात होत्या. नाशिकच्या कॉलेज रोड येथील अशोक खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोऱ्हे जात होत्या. अशोक खरात पाथर्डी येथील पैसा हॉटेलमध्ये भेटायला आला होता. तो तिथं तुम्हाला भेटण्यास का आला होता. तुमच्यात आणि त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार आहेत का? का आणखीन काही हे सगळ्या गोष्टी समोर यायला हवेत, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
नाशिकमधील एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये निलम गोर्हे आणि खरात भेटले. आमदारकी आणि मंत्रीपदासाठी अनेक वेळा त्या अशोक खरातला भेटल्या होत्या. नीलम गोऱ्हे या भविष्य पाहण्यासाठी जात होत्या. विधान परिषद किंवा मंत्रीपदासाठी नीलम गोऱ्हे या नाशिकच्या कॉलेज रोडवरील अशोक खरातच्या ऑफिसला भेटायला जात होत्या. ज्या ऑफिसमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाला, त्याच ऑफिसला नीलम गोऱ्हे अशोक खरातला भेटल्या होत्या. त्या गेल्या सात ते आठ वर्षांपासून अशोक खरातला ओळखत होत्या. कोरोना महामारी पूर्वी एका हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे यांना भेटण्यासाठी अशोक खरात आला होता, असा दावा देखील तृप्ती देसाई यांनी केला आहे
नीलम गोऱ्हे यांचा अशोक खरात यांच्याशी काही आर्थिक देवाणघेवाण आहे का? याच्याबाबत एसआयटीने चौकशी करायला हवी, असं तृप्ती देसाईंनी सांगितले. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत अशोक खरात यांना भेटायला जे जात होते, ते मला येऊन भेटले आहेत. त्यांनी मला या संदर्भात सगळी माहिती दिली आहे. आणि वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणेल, असा दावाही तृप्ती देसाईंनी केला. रूपाली चाकणकरांवर ज्या पद्धतीने कारवाई झाली त्याच पद्धतीने नीलम गोऱ्हे यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी, अशी मागणी तृप्ती देसाईंनी यावेळी केली.
मात्र निलम गो्रहे यांनी तृप्ती देसाईंनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्या म्हणाल्या कि हे सर्व आरोप कपोलकल्पित आणि आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. पुणे महानगरपालिकेत ज्यांना अपयश आले, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत.





