नाशिक – भोंदू अशोक खरातच्या व्हीआयपी दरबाराचा भांडाफोड करण्यात आला आहे. भोंदू अशोक खरातने अनेक भक्तांना कोट्यावधी रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या मोठ्या रांगा त्याच्या दरबारात लागत होत्या. भोंदूबाबाला अलिशान गाड्यांचाही शौक असल्याची माहिती समोर आली आहे. स्पॉट व्हिजिटसाठी भोंदूबाबा अशोक खरात भक्तांकडून ५ लाख रुपयांपर्यंत फी आकारत असल्याची माहिती मिळाली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता त्याच्या आर्थिक साम्राज्याची सर्व माहिती बाहेर पडू लागली आहे. एसआयटीकडून सुरू असलेल्या चौकशीत भोंदू अशोक खरातने भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडून त्यांना कोट्यावधी रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे. भोंदू अशोक खरात हा भक्तांच्या मानसिकतेचा पूर्णपणे फायदा घेत होता. माहितीनुसार, लोकांच्या घरी, कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वास्तू पाहण्यासाठी जाण्यासाठी तो ५ लाख रुपयांपर्यंत फी आकारणी करत असे.
भेटीसाठी जाण्यासाठी तो भक्तांकडून महागड्या गाड्यांची मागणी करत असे. काही भक्तांनी त्याला महागड्या गाड्या भेट म्हणून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. भोंदू अशोक खरातच्या दरबारात अमावस्या आणि पौर्णिमेला भक्तांची तुफान गर्दी व्हायची. मात्र, या गर्दीतही त्याने आर्थिक भेदाभेद केला होता. जो भक्त जास्त पैसे देईल, त्याला पहिले दर्शनासाठी प्राधान्य दिले जात असे. रात्रीचाही हा दरबार सुरू असायचा. भोंदू अशोक खरातने काही भक्तांकडून 20 लाखांपर्यंत खर्च करून घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीतील ४ एकर जमिनीच्या खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणात भोंदू अशोक खरात याच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भोंदू अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, मध्यस्थ एजंट अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांचाही समावेश आहे.
आरोपींनी कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. फसवणूक आणि सावकारकी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक केले आहे. या प्रकरणातील सर्व व्यवहारांची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. शिर्डीत भोंदू अशोक खरातची कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात अधिक तपास नाशिक पोलिस करत आहेत.





