महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवे वादंग

SHARE:

मुंबई – जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळात एक मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराणी ताराराणी या जैन समूदायच्या होत्या, औरंगजेबाचा नाश करण्यासाठी ताराराणींचा जन्म झाला, असे वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केले. मुंबईतील जैन समूदायाच्या एका कार्यक्रमात बोलतांना आचार्य नयन पद्मसागर यांनी हे वक्तव्य केलय.

आचार्य नयन पद्मसागर यांनी आपल्या संबोधनात म्हटले की मुघल सम्राट औरंगजेबाचा नाश करण्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी जैन धर्मीय असलेल्या महाराणी ताराबाईंचा जन्म झाला होता. भारतीय इतिहासात स्वराज्य रक्षणासाठी आणि औरंगजेबाच्या आक्रमणाविरुद्ध प्रखर लढा देण्यासाठी महाराणी ताराबाईंचे योगदान अतुलनीय मानले जाते. आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराबाई यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे इतिहास संशोधक आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आचार्य नयन पद्मसागर यांनी आपल्या भाषणात इतिहासातील विविध दाखले दिले. ते म्हणाले की मोहम्मद घोरीने जेव्हा भारतावर आक्रमण केले, तेव्हा मेवाडच्या एका जैन राणीने शस्त्र उपसले होते. त्यानंतर अनेक वर्षे कोणाचीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात शस्त्र धरणे, हाच खरा धर्म आहे. याच ओघात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा उल्लेख केला आणि औरंगजेबाचा नाश करण्यासाठी आणखी एका ‘जैन महाराणी ताराराणींचा जन्म झाला, असे वक्तव्य त्यांनी केले.

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी दाव्यावर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंद्रजीत सावंत म्हणाले, महाराणी ताराराणी या शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आहेत. स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या आहेत. शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत. ताराराणी साहेब या मराठा आहेत. या बदल कोणाचेही दुमत असता कामा नये. कारण या संदर्भात शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी महाराज या आपल्याच समाजात जन्माला याव्यात असं जगातल्या सर्वच लोकांना वाटतं.

मात्र असं असलं तरी देखील त्यांच्याबद्दल वक्तव्य करत असताना इतिहासाची माहिती घेणे तितकंच गरजेचं आहे. सध्या एका जैन मुनी यांनी ताराराणी या जैन असल्याचे वक्तव्य केलंय. जो जैन समाज शांततेसाठी आणि अहिंसेसाठी ओळखला जातो. त्या समाजातील प्रमुखांनी असं वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये असं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी सांगितले.

मराठा इतिहासाची मोडतोड करण्याचं एक षडयंत्र सुरू आहे. या षडयंत्रचा एक भाग या आचार्य मुनीनी होऊ नये असं मला वाटतं. महाराष्ट्र अशा पद्धतीचे वक्तव्य कधीही सहन करणार नाही त्यामुळे या आचार्याने हे समजून घेतलं पाहिजे असंही इंद्रजीत सावंत म्हणाले.

माहित असावे कि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी २५ वर्षे औरंगजेबशी लढा दिला आणि त्याला जेरीस आणलं. ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली. हा इतिहास असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेला दावा दाधांत खोटा आहे.

Leave a Comment

अधिक वाचा