हिंदूंना अस्तित्व वाचवण्यासाठी ‘तालिबान-आयएसआयएस’ सारखी सेना तयार करावी लागेल; दासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांचे वक्तव्य

SHARE:

नवी दिल्ली – वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे दासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनी पुन्हा एकदा भडकाऊ वक्तव्य केल आहे. हिंदूंना आपले अस्तित्व वाचवण्यासाठी तालिबान-आयएसआयएस सारखी सेना तयार करावी लागेल. आरएसएस आणि बजरंग दलावर अवलंबून राहिल्यास सनातन धर्माचे अस्तित्व शक्य नाही, असे यती नरसिंहानंद म्हणाले. ते गुना येथील दौऱ्यादरम्यान पंचमुखी हनुमान मंदिरात पत्रकारांशी बोलत होते.

यती नरसिंहानंद म्हणाले कि जर हिंदूंना टिकायचे असेल, तर त्यांनी तालिबान आणि आयसिसच्या धर्तीवर स्वतःचे सैन्य उभारले पाहिजे. जर कोणी तालिबान आणि आयसिसप्रमाणेच सैन्य तयार करण्यास सक्षम असेल, तर ते त्यांना पूर्णपणे पाठिंबा देतील. जर आपण बजरंग दल आणि आरएसएससारख्या संघटनांच्या जाळ्यात अडकत राहिलो, तर भविष्यात सनातन्यांकडे काहीही उरणार नाही. हिंदू रक्षा सेना किंवा हिंदू सुरक्षा सेना यांसारखी नावे म्हणजे केवळ सोशल मीडियावर फोटो टाकून नाटक करणाऱ्या संघटना आहेत.

ते म्हणाले की हे लोक राजकारण्यांची खुशामत करून निवडणूक लढवतात, पण त्यांच्यात आपल्या धर्मासाठी लढण्याचे धैर्य नाही. नरसिंहानंद पुढे म्हणाले की आता हिंदूंसाठी हा शेवटचा आश्रय आहे. जर हे सुद्धा इस्लामच्या तावडीत सापडले, तर सनातन धर्म पूर्णपणे नष्ट होईल. जर हिंदूंना टिकून राहायचे असेल, तर त्यांना आयसिससारखी पद्धत अवलंबावी लागेल, कारण आता केवळ बलिदानानेच धर्माचे रक्षण होऊ शकते.

सरकारे असे कायदे करतात जे हिंदूंना एकमेकांविरुद्ध उभे करतात. यूजीसी आणि देशाच्या कायद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले म्हटले की भारतातील कायदे भेदभाव दूर करण्यासाठी नव्हे, तर हिंदूंना एकमेकांविरुद्ध उभे करून त्यांना नष्ट करण्यासाठी बनवले आहेत. सनातन धर्माच्या विरोधात जाचक कायदे करणाऱ्या सरकारांना विरोध करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

केरळ फाईल्सप्रमाणेच, गुना येथील बलात्कार प्रकरणाबाबत ते म्हणाले की, हे आपल्या दुर्बलतेचे फळ आहे. मुस्लिम महिला मुस्लिम पुरुषांपेक्षा अधिक जिहादी आहेत. म्हणूनच कोणत्याही हिंदू मुलीने त्यांच्याशी मैत्री करू नये. नरसिंहानंद म्हणाले की जरी भारत विश्वगुरू बनला, तरी तो सनातन भारत नसून मुस्लिम भारत असेल. त्यांनी दावा केला की, ज्या वेगाने लोकसंख्येतील असमतोल वाढत आहे, त्यामुळे आपला विनाश होईल.

त्यांनी हिंदू धर्मगुरूंवरही टीका केली आणि म्हणाले की जे गुरू भारताला जगाचा नेता बनवण्याचा दावा करतात, ते प्रत्यक्षात आपल्या अनुयायांना फसवतात. ते आपल्याच लोकांना फसवतात. ते जमेल तेव्हा पैसे कमावतात आणि मग देश सोडून पळून जातात. आरएसएस आणि बजरंग दल यांसारख्या संघटनांना नपुंसक असून, त्यांच्यावर अवलंबून राहून सनातन धर्माचे टिकणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, देश अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार नाही. देश गेल्या १४०० वर्षांपासून शरणागतीच्या अवस्थेत आहे. आपल्या देशात केवळ मूठभर लोकांनीच लढा दिला आहे. आपण आपल्या पूर्वजांचे आभारी असले पाहिजे, ज्यांनी गरिबी आणि अत्याचार सहन केले, पण अधिक मुलांना जन्म दिला. त्यामुळेच आज आपण वाचलो आहोत. दहशतवादाचे केंद्र केवळ अरब किंवा पाकिस्तान नाही, तर भारतातील दारुल उलूम देवबंद आणि बरेलीसारखी केंद्रेही आहेत, जी तालिबानचे खरे वैचारिक सूत्रधार आहेत, असा बेतुका दावाही त्यांनी केला. यती नरसिंहानंद यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा