कल्याण – सार्वजनिक आरोग्य विभागाने सार्वजनिक खासगी भागीदारीत राज्यात सुरू केलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवा ही राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जीवनदायिनी माणली जाते. मात्र हीच १०८ रूग्णवाहिका तब्बल ४० मिनिटे उशीरा पोहचल्याने एका वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. मेवालाल गुप्ता असं मृत व्यक्तीचे नाव असून आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आणणारी ही घटना कल्याण परिसरात घडली.
प्राप्त माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील निवासी मेवालाल गुप्ता यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांच्या कुटुंबाने १०८ आपत्कालीन सेवेला फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली. त्याची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनीही वारंवार १०८ वर संपर्क साधला. मात्र रुग्णवाहिका ४० मिनिट उशीराने घटनास्थळी पोहचली. रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने मेवालाल गुप्ता यांचा मृत्यू झाला, असा आरोप आहे.
धक्कादायक म्हणजे रुग्णाला घेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी आली. मात्र त्यात डॉक्टरच नव्हते. डॉक्टर रुग्णवाहिकेच्या मागून आरामात खासगी गाडीवरून घटनास्थळी आल्याचाही आरोप स्थानिकांनी केला. दरम्यान रुग्णाच्या मृत्यूनंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या डॉक्टरनं मात्र आपण अवघ्या १० मिनटात घटनास्थळी पोहचल्याचं वक्तव्य केलं. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेत मदत मिळाली असती तर जीव वाचला असता, असा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.
या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला असून आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून कारवाईचे आदेश दिले असले तरी आरोग्य यंत्रणांच्या हलर्जीपणामुळे एखाद्याचा जीव जात असेल तर 108 नंबरचा काय उपयोग, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.





