नवी दिल्ली – आम आदमी पार्टीमध्ये आज मोठी फूट पडली असून, राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली या ७ खासदारांनी अधिकृतपणे भाजपमध्ये विलीनीकरणाची घोषणा केली आहे. दोन-तृतीयंश बहुमताचा आकडा गाठल्यामुळे या खासदारांचे सदस्यत्व धोक्यात येणार नाही, असा तांत्रिक दावाही यावेळी करण्यात आला.
नेमके काय घडले?
गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा आणि ‘आप’ नेतृत्वात मतभेद असल्याची चर्चा होती. आज पत्रकार परिषदेत चड्ढा यांच्यासह संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी भाजपमध्ये सामील होत असल्याचे स्पष्ट केले. स्वाती मालीवाल, हरभजन सिंह, राजेंद्र गुप्ता आणि विक्रम साहनी हे देखील या गटात सामील आहेत.
आता ‘आप’ कडे फक्त ३ खासदार
या बंडांनंतर राज्यसभेत आम आदमी पार्टीकडे आता केवळ संजय सिंह, बलबीर सिंह सीचेवाल आणि एन.डी. गुप्ता हे ३ खासदार उरले आहेत. पंजाबमधील बहुतांश खासदारांनी बाजू बदलल्यामुळे पंजाबच्या राजकारणातही याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.





