आमदार संजय गायकवाड यांचे वक्तव्य जनता सहन करणार नाही; खासदार छत्रपती शाहू महाराज यांची कडक कार्यवाहीची मागणी

SHARE:

कोल्हापूर – आमदार संजय गायकवाड यांचे वक्तव्य जनता सहन करणार नाही, व त्यांच्याविरोधात कडक कारवाईची गरज आहे, असे खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले आहेत. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर छत्रपती शाहू महाराज यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, व संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या जाहीर वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरुन राज्यात वाद वाढला आहे.

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरुन कोल्हापूरमधील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार संजय गायकवाड यांच्याविषयी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय गायकवाड यांनी केलेले वक्तव्य आता राज्यातील जनता सहन करणार नाही. या राज्यात कोणाबद्दल काय बोलायचे हे आमदाराला समजायला हवे, असे शाहू महाराज म्हणाले आहेत. कोल्हापूरमध्ये ते बोलत होते. यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे.

या संदर्भात सरकारला जी योग्य वाटते ती कारवाई लवकर करावी. या राज्याच्या भाजपा सरकारमध्ये काही गोष्टी लगेच होत नाहीत. आमदारकी रद्द करण्यासंदर्भात काय नियम आहेत हे मला माहीत नाही. मात्र, संजय गायकवाड यांनी ज्या पध्दतीने वक्तव्य केले आहे ते बिलकुल योग्य नाही. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याकडे आता राज्यातील जनताच लक्ष देईल, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिली आहे. शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी या प्रकरणी गुरुवारी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. आम्ही आमच्या वकिलांशी बोलून तुम्हाला कळवतो, असे पोलिसांनी प्रशांत आंबी यांना सांगितले.

आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचे म्हणत शिवीगाळ केली होती. अरे गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहिती आहे ना, त्या गोविंद पानसरेंचे काय झाले? त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन, अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिली होती. या प्रकरणात आता कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा