अनु. जातीच्या नवरदेवाला घोड्यावरून ओढून उच्चवर्णीयांनी केली मारहाण; आरोपींवर गुन्हा दाखल

SHARE:

मध्य प्रदेश – भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १५ अंतर्गत जातीय भेदभाव आणि अनुच्छेद १७ अंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आली. मात्र संविधान लागू होऊन जवळपास ७६ वर्षे लोटल्यानंतरी सरकारे देशात भेदभाव समाप्त करण्यात अपयशी ठरली आहेत. याचा अंमलबजावणीचा कायदाच नसल्यामुळे जातीय भेदभावाच्या घटना कमी होण्याऐवजी वाढून राहिलेल्या आहेत. दरम्यान मध्य प्रदेशातील दमोह जिल्हयातून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे अनु.जातीच्या नवरदेवाला घोड्यावरून ओढून मारहाण करण्यात आली. ही घटना दमोह जिल्ह्यातील हाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बिजोरी पाठक गावात घडली. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ एप्रिल रोजी गोलू अहिरवाल या अनु.जातीच्या तरुणाची वरात छतरपूर जिल्ह्यातील बक्सवाहा येथे जाणार होती. वरात निघण्यापूर्वी, वराला घोड्यावर बसवून गावातून मिरवणूक काढण्यात आली, या दरम्यान महिला आणि मुलांसह कुटुंबातील सदस्य आनंद साजरा करत होते. मात्र वरात गावातील उच्च जातीच्या परिसरात पोहोचताच दंगल उसळली. जेव्हा सवर्ण लोकांनी अनु.जातीच्या तरुणाला घोड्यावर बसलेले पाहिले, तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला.

सनातनी परंपरांचा हवाला देत, त्यांनी दावा केला की अनु.जातीच्या वराला घोड्यावर बसण्याची परवानगी नाही, आणि या हिंसक लोकांनी त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्या लोकांनी वराला खाली पाडले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. वराच्या बहिणीलाही सोडले नाही आणि भाऊ व बहीण दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर नवरदेवाला पोलीस ठाण्यात आणि रुग्णालयात दाखल व्हावे लागले.

या घटनेनंतर, संपूर्ण वरात हाटा पोलीस ठाण्यात पोहोचली, जिथे पीडितांनी तक्रार दाखल केली. नवरदेव गोलू आणि त्याच्या बहिणीला अनेक जखमा झाल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांची प्रकृती काहीशी सुधारल्यानंतर, वरात रात्री उशिरा बक्सवाहाकडे निघाली.
पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, घुप्पू लोधी, विश्वनाथ लोधी, विचू लोधी आणि चिन्नू लोधी यांनी जातीयवादी शिवीगाळ करत गोलूला घोड्यावरून खाली खेचले आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा नवरदेवाला मारहाण होताना पाहून त्याची बहीण मनीषा त्याच्या मदतीला धावून आली, तेव्हा आरोपींनी तिलाही सोडले नाही. मनीषाला मारहाण करण्यात आली आणि या झटापटीत तिचे काही सोन्याचे दागिनेही गायब झाल्याचा आरोप आहे. नवरदेवाची आई, विद्या अहिरवार म्हणाल्या कि आम्ही त्यांना विनवणी केली की आज लग्नाची वरात निघणार आहे, घोड्यावर बसल्याशिवाय विधी कसे पूर्ण होतील? पण त्यांनी आमचे काहीही ऐकले नाही आणि आमच्यावर हल्ला केला.

या प्रकरणी हाटा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुधीर बेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांच्या तक्रारीच्या आधारे, लोधी समाजाच्या सदस्यांविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बिजोरी पाठक गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. या घटनेने सरकार आणि प्रशासनाचे दावे उघडे पाडले आहेत.
बुंदेलखंडमधील दमोहमध्ये घडलेली ही पहिली घटना नाही. यापूर्वी २०२५ मध्ये, टिकमगड जिल्ह्यातील मोखरा गावात, जितेंद्र अहिरवार नावाच्या अनु. जातीच्या वरावर घोड्यावर बसल्याबद्दल दगडफेक करण्यात आली होती. डिसेंबर २०२४मध्ये, दमोह जिल्ह्यातीलच चौराई गावात, एका अनु.जातीच्या वराला रथातून फेरफटका मारल्याबद्दल समाजकंटकांनी रथाची तोडफोड करून वराला मारहाण केली होती. आजही बुंदेलखंडच्या ग्रामीण भागात अनु.जातीच्या वराला घोड्यावर बसण्यावरून वाद निर्माण होत आहेत.

Leave a Comment