मुंबई – प्राध्यापकाची ऑर्डर परत करण्याच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. मुंबईमधून ऑनलाइन फसवणुकीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तर एका प्राध्यापकाची २.५७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. मुंबइतील ट्रॉम्बे परिसरात ऑनलाइन शॉपिंग ॲपवरील ऑर्डर परत करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगारांनी ही फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेतील तक्रारदार हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
ते नवरोजी कॅम्पस येथे कुटुंबासह राहतात. ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी त्यांनी इन्स्टा मार्ट ॲपवरून किराणा सामानाची ऑर्डर दिली होती. मात्र डिलिव्हरीमध्ये काही चुकीच्या वस्तू आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. गुगलवर शोध घेतल्यानंतर त्यांना एक मोबाईल क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वतःला कस्टमर केअर प्रतिनिधी असल्याचे भासवले.
त्यानंतर त्याने व्हॉटसॲपवर एक लिंक पाठवून पैसे परत मिळतील असे सांगितले. प्राध्यापकांनी विश्वास ठेवून त्या लिंकवर क्लिक केले. मात्र, त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २५०००, ८९०००, १२७०००, ७००० आणि ९५०० रुपये असे एकूण २,५७,५०० रुपये काढण्यात आले आहेत. ही फसवणूक लक्षात येताच तक्रारदार प्राध्यापकांनी सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार नोंदवली आहे. त्यांन ॲक्नॉलेजमेंट क्रमांक देण्यात आला आहे.
पुढील तपासासाठी प्राध्यापकांनी मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यातही धाव घेतली आहे. या घटनेमुळे ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच अधिकृत कस्टमर केअर क्रमांकाची खात्री करूनच संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. या प्रकरणात अधिक तपास मुंबई पोलिस करत आहेत.






